मुंबई - बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने तमाम विरोधक आणि बॉलिवूड बॉयकॉट गँगचे तोंड अशा प्रकारे बंद केले की 'पठाण' बद्दल बोलण्यापूर्वी ते आता 100 वेळा विचार करतील. पठाण चित्रपटाने 12 दिवसात 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या चार वर्षांपासून ज्याचे बॉलिवूड करिअर संपुष्टात आले होते, असे वाटले होते, त्या शाहरुख खानने अखेर 'पठाण जिंदा है' हे दाखवून दिले.
पठाणचे 12 व्या दिवसाचे कलेक्शन - 25 जानेवारी रोजी रिलीज झालेला 'पठाण' चित्रपट 13 व्या दिवशी तितकाच जोरात सुरू आहे. चित्रपटाने 12व्या दिवशी (रविवार-5 फेब्रुवारी) म्हणजेच दुसऱ्या वीकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 28 कोटी रुपयांची कमाई केली. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 400 कोटी रुपये झाले आहे.
पठाणने एकूण ८३२ कोटी कमाई केल्याचा यशराज फिल्म्सचा दावा - पठाण चित्रपट थांबायचे नावच घेत नाही, असे कॅप्शन देत यशराज फिल्म्सने एक बॅनर फोटो शेअर केला आहे. यावर त्यांनी पठाची एकूण कमाई अधोरेखीत केली आहे. जगात सर्वाधिक कमाई करणारा हिंदीतील पहिला सिनेमा, असे लिहिले असून जगभरातील एकूण कमाई ८३२ कोटी झाल्याचे म्हटले आहे. पठाण चित्रपटाने भारतात एकूण कमाई ( तेलुगु, तमिळसह ) ५१५ कोटी कमवले आहेत. तर परदेशात ३१७ कोटींची कमाई झाली असल्याचे जाहीर केले आहे.