मुंबई - Parineeti Raghav wedding: आपचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा त्यांच्या लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये दिल्लीहून पोहोचले आहेत. या आठवड्याच्या अखेरीस ते विवाह बंधनात अडकणार आहेत. उदयपूर विमानतळावर दाखल झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत.
लाल रंगाच्या जंपसूट आणि क्रिम शॉलमध्ये परिणीती अतिशय सुंदर दिसतेय. राघवने काळ्या रंगाचे स्वेटर आणि निळा डेनिम परिधान केला होता. त्याच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत आहे.
यापूर्वी, या दोघांनी त्यांच्या जवळच्या मित्रांसह नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सूफी संगीताचं आयोजन केलं होतं. परिणीती चोप्राची चुलत बहीण प्रियांकाने ती चुकवली पण तिच आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ यांनी दिल्लीतील राघवच्या घरी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. संगीत रात्रीच्या आधी परिणीती आणि राघव यांनी नवी दिल्लीतील गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले आणि तेथील अरदास आणि कीर्तनात भाग घेतला.
राघव आणि परिणीतीचा 13 मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला येथील राघवच्या घरात साखरपुडा पार पडला होता. यावेळी त्यांनी आपल्या प्रियजनांच्या उपस्थितीत अंगठ्याची देवाणघेवाण केली होती. या स्टार स्टडेड समारंभात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक राजकारण्यांनी हजेरी लावली होती.
राघव आणि परिणीती या दोघांनी लग्नाआधी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगणे पसंत केलं होतं. ते डेटिंग करायला सुरुवात करण्यापूर्वी अनेक वर्षांपासून ओळखत होते. या जोडप्याला अलीकडेच उदयपूरमधील विवाहसोहळ्यासाठी लोकेशन शोधताना पाहिले होते. तेव्हाच अनेकांनी ते आपला विवाह प्रियंका आणि निक प्रमाणेच राजस्थानात करतील असा अंदाज अनेकांनी बांधला होता.