नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज साखरपुडा हा ताजमहाल हॉटेलपासून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मानसिंग रोडवरील विस्तीर्ण कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी परिणीतीची चुलत बहीण आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास ही देखील दिल्लीत दाखल झाली आहे. प्रियांकाला दिल्ली एअरपोर्टवर सकाळी स्पॉट करण्यात आले. त्यावेळी प्रियांकाने तपकिरी रंगाचे अॅक्टिव्हवेअर परिधान केले होते. या कार्यक्रमाला जोडप्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक येतील हे नक्की. त्यामुळे दिल्ली एअरपोर्टवर अनेक सेलिब्रिटी आज बघायला मिळणार आहेत. तसेच या कार्यक्रमात मनिष मल्होत्रा देखील उपस्थित राहणार आहे.
पंजाबी शैलीमध्ये होणार साखरपुडा : या समारंभासाठी परिणीती ही मनीष मल्होत्राच्या डिझाइन केलेल्या वेशभूषेत दिसेल. तसेच राघव हा मामा पवन सचदेव यांनी डिझाइन केलेले शेरवाणीमध्ये दिसणार आहे. हा साखरपुडा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. या समारंभात आधी शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमधील सुखमणी साहिबचे जप म्हटले जाईल आणि त्यानंतर 'अरदास' किंवा पवित्र प्रार्थना म्हटली जाईल. पूर्ण कार्यक्रम हा पंजाबी शैलीमध्ये होणार आहे. शिवाय या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि बॉलीवूडमधील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परिणीतीच्या साखरपुड्यापुर्वी मुंबईतील वांद्रे भागातील अपार्टमेंटमध्ये फार सुंदर देखावा केला होता. संपुर्ण अपार्टमेंट हे दिव्याने आणि लाईटेसने सजविले होते. या देखाव्याचा व्हिडिओ हा छायाचित्रकार विरल भयानीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता.