मुंबई -अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित आगामी अॅक्शन थ्रिलर 'अॅनिमल'सध्या बऱ्यापैकी हवा निर्माण करण्यात निर्माते यशस्वी झाल्याचं दिसतंय. यापूर्वी चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी प्रदर्शित केल्यानंतर आता यातील तिसरे गाणे 'पापा मेरी जान' मंगळवारी निर्मात्यांनी रिलीज केले. या गाण्याचे पोस्टर अनिल कपूरनं इंस्टाग्रामवर पोस्ट केले होतं.
सोनू निगमने गायलेलं हे हृदयस्पर्शी गाणं अभिनेता अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्यातील ऑनस्क्रिन पिता-पुत्राच्या नात्यावर प्रकाश टाकते. हे गाणे हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात आलंय. राजशेखर यांनी हिंदीमध्ये लिहिलेलं गाणं हर्षवर्धन रामेश्वर यांनी संगीतबद्ध केलंय.
'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढीस लागली. हुवा मैं आणि सतरंगा ही दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतील उतरली होती. या गाण्यांमुळे चित्रपटातील संगीत प्रभावी असल्याचं दिसून आलंय. आता रिलीज करण्यात आलेलं 'पापा मेरी जान' हे गाणं आणखी एका उंच स्तरावर घेऊन जाणारं आहे.
'पापा मेरी जान' हे गाणं अनिल कपूर आणि त्यांचा मुलगा मुलाच्या रणबीर कपूर यांच्या पडद्यावरील केमेस्ट्रीचं उत्तम उदाहरण आहे. वडीलांपासून नाराज झालेला मुलगा आणि त्याच्यावर प्रेम करणारा हळवा बाप यांची गोष्ट या गाण्यातून दिसते. यात वडील आणि मुलाचे संबंध ताणले गेले आहेत आणि आता प्रौढ झालेला हा मुलगा कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांचा बचाव करण्यास तयार आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरीज, प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानी यांच्या सिने१ स्टुडिओयांनी 'अॅनिमल' चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीचीही प्रमुख भूमिका आहे. रणबीरची जोडीदार गीतांजलीच्या भूमिकेत रश्मिका मंदान्ना झळकली आहे. हा क्राईम ड्रामा असलेला अॅनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता, परंतु पोस्ट प्रोडक्शनच्या कामामुळे ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.