मुंबई - Main Atal hoon trailer 2 : अभिनेता पंकज त्रिपाठी हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. रुपेरी पडद्यावर कॉमेडी चित्रपट आणि खलनायकी पात्र त्याने खूप उत्तम प्रकारे साकारली आहेत. दरम्यान त्याचा ' मैं अटल हूं' हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत तो खूप दमदार दिसतआहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक, 'मैं अटल हूं'ची वाट आता अनेकजण पाहत आहेत. दरम्यान या चित्रपटामधील दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये अटलबिहारी वाजपेयी हे देशासाठी कठीण निर्णय घेताना दिसत आहे.
'मैं अटल हूं'चा दुसरा ट्रेलर रिलीज : काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर अनेकांना आवडला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर सोशल मीडियावर खळबळ उडवतांना दिसत आहे. अटलबिहारी वाजपेयी हे फक्त राजकारणी नव्हते तर एक कवी आणि महान नेते देखील होते. विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, लीजेंड स्टुडिओज ,संदीप सिंग आणि कमलेश भानुशालीनं त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेत 'मैं अटल हूं' हा चित्रपट निर्मित केला आहे. या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा देशासाठी केलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे.