मुंबई - काही वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम वर खूप चर्चा सुरू होती आणि 'आतील' आणि 'बाहेरील' असा वाद सुरू होता. किंबहुना तो आताही आहे. परंतु पूर्वीच्या जोमाने नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टारडम मिळविणे हे अनेकांचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मायानगरी मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी येत असतात. त्यात अननुभवी लोकांचा भरणा जास्त असतो आणि केवळ ग्लॅमरला भुलून ही लोकं मुंबईत आलेली असतात. ॲक्टर बनण्यासाठी केवढी मेहनत घ्यावी लागते याची त्यांना कल्पना नसते.
बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची मांदियाळी - मुंबईत येणाऱ्या गर्दीत ५-१० टक्के लोकं असतात, ज्यांनी रंगभूमीवर काम केलेले असते. तर काही अभिनय आणि तत्सम कोर्सेस करीत आलेले असतात. परंतु एक चान्स मिळणे हे चमत्कारापेक्षा कमी नसते. याउलट जी आधीच फिल्म इंडस्ट्रीत आहेत त्यांची मुले या क्षेत्रात येत राहतात आणि त्यांना सगळे सोप्पे जाते. स्टार किड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमातीला स्ट्रगल करावे लागत नाही. काही अभिनेते फक्त या स्टारकिड्सना, भले त्यांच्याकडे टॅलेंट असो वा नसो, घेऊन चित्रपट निर्मिती करीत असतात. त्यांचे चित्रपट फ्लॉप झाले तरी त्यांना आणखीन संधी मिळत असतात. याचा दूरगामी परिणाम म्हणजे इतर कलाकार, ज्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. परंतु संधी नाही. ते कुजत पडतात. ते परत जातात किंवा मुंबईत हलाखीच्या परिस्थितीत दिवस, वर्षे काढीत असतात. 'बाहेरून' आलेल्या काहींना संधी मिळाली व त्यांनी त्याचे सोने केले. परंतु अशा यशस्वी झालेल्या आर्टिस्ट्सना फिल्म इंडस्ट्रीमधील काही पॉवरफुल मंडळी त्रास देऊ लागली आणि त्यांना काम मिळू नये असा प्रयत्न करू लागली. त्याच सुमारास अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. तो फिल्म इंडस्ट्रीमधील आतल्या लोकांनी त्रास दिल्यामुळे झाला. असा समज निर्माण होऊन सामान्य जनता पेटून उठली. बॉयकॉट बॉलीवूडही टूम निघाली. यातूनच आतला आणि बाहेरचा हा वाद सुरू झाला.
आऊट साइडर तापसीची एन्ट्री- बाहेरून आलेल्या आणि यशस्वी कलाकारांपैकी एक म्हणजे तापसी पन्नू आहे. सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटांत काम केल्यानंतर तिला चष्मेबद्दुर या हिंदी चित्रपटात दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी लॉन्च केले. त्यानंतर नाही म्हणायला तिचा प्रवास खडतर होता. परंतु आत्मविश्वास आणि कठोर मेहनत या जोरावर तापसीने फिल्म इंडस्ट्रीत आपली जागा बनविली. हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या पदार्पणाला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली. या दशकपूर्तीसाठी ती समाधानी आहे. आता तर ती स्वतः निर्माती सुद्धा बनली. तिने तिच्या निर्मितीसंस्थेचे नाव 'आऊटसायडर फिल्म्स' असे ठेवले आहे. अर्थात त्यातून बरेच काही अभिप्रेत होत असले तरी तापसी शांतपणे आपले मार्गक्रमण करीत आहे. तिने या १० वर्षांत आऊटसायडर ते आघाडीची अभिनेत्री असा पल्ला गाठला आहे आणि त्याबद्दल तिला गर्व आहे.