ऑस्कर विजेती ज्येष्ठ अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी पुष्टी केली आहे की तिचा मृत्यू फ्रान्समधील मॉन्टदुरास येथील तिच्या घरी नैसर्गिक कारणांमुळे झाला. लुईस फ्लेचर 1975 मध्ये मिलोस फोरमन दिग्दर्शित वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट या चित्रपटात नर्स रॅचेडच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. या चित्रपटात जॅक निकोल्सननेही काम केले होते. या भूमिकेसाठी तिला 1976 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्करही मिळाला होता.
लुईसचा जन्म 22 जुलै 1934 रोजी बर्मिंगहॅम, अलाबामा, यूएसए येथे झाला. तिचे आई-वडील बहिरे होते. लुईसने 1950 च्या उत्तरार्धात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, लॉमन, बॅट मास्टरसन, मॅव्हरिक, द अनटचेबल्स आणि 77 सनसेट स्ट्रिप यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये ती दिसली. लुईस तिच्या 60 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसली आहे.
अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी लुईसचा अकादमी पुरस्कार स्वीकारल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती आपल्या आई वडिलांचे स्मरण करताना सांकेतिक भाषेचा वापर करताना दिसते, हा एक खूपच हळवा क्षण होता.