मुंबई : ख्रिस्तोफर नोलनचा चित्रपट 'ओपेनहायमर'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी दिसली. टॉम क्रूझच्या मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १च्या पहिल्या दिवशाच्या कलेक्शनपेक्षा या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केली आहे. टॉम क्रूझच्या 'मिशन: इम्पॉसिबल ७'ने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १२.५ कमाई केली होती, तर 'ओपेनहाइमर' या चित्रपटाने १३.५० कोटीची कमाई केली आहे. 'ओपनहायमर' हा चित्रपट रॉबर्ट ओपेनहायमर ह्यांच्या जीवनावर आधारित आहे. ओपनहायमर हे एक अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि दुसऱ्या महायुद्धात लॉस अलामोस प्रयोगशाळेचे ते संचालक देखील होते. तसेच जे. रॉबर्ट यांना अणुबॉम्बचे जनक म्हणून सुद्धा संबोधले जाते. ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटात सिलियन मर्फी हे भौतिकशास्त्रज्ञ जे. रॉबर्ट ओपेनहायमरच्या भूमिकेत आहे.
'ओपनहाइमर' चित्रपटाने केली जबरदस्त कमाई : हा चित्रपट दुसर्या महायुद्धादरम्यान सेट केलेला, बायोपिक असून या चित्रपटात त्यावेळी काय झाले होते, या सर्व गोष्टी चित्रपटाद्वारे सांगण्यात आल्या आहेत. 'ओपनहाइमर' चित्रपटाने सुरुवातीच्या दिवशीच भारतीय प्रेक्षकांवर जादू केली आहे, कारण या चित्रपटाला एकूण ४८.७६% व्याप मिळाला. या चित्रपटाला भारतात संमिश्र प्रतिसाद मिळत असून, 'ओपनहाइमर'ने आश्चर्यकारक कमाई करून आपले भारतीय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले आहे. 'ओपेनहायमर' चित्रपटाचा जेव्हा टिझर रिलीज झाला होता त्यावेळी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू होती.