मुंबई - भारतीय चित्रपट विश्वात मणिरत्नम हे एक अढळ स्थान निर्माण केलेले महान दिग्दर्शक आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील महान कथाकार असलेल्या मणिरत्नम यांनी केवळ प्रादेशिक कथांना आपल्या सिनेमांचा मध्यवर्ती विषय कधीच बनवला नाही. त्यांच्या प्रत्येक सिनेमाची गोष्ट ही वैश्विक राहिली आहे. यामुळे ते भारतातील वेगळे दिग्दर्शक ठरतात. 2 जून 1956 रोजी मदुराई येथे जन्मलेले मणिरत्नम आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
खरंतर मणिरत्नम यांना चित्रपट घराण्याचा वारसा आहे. त्यांचे वडिल चित्रपटांचे वितरक होते आणि त्यांचे चुलते तामिळ चित्रपटाचे एक यशस्वी निर्माता होते. अशी घराण्याची पार्श्वभूमी असूनही या क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी मॅनेजमेंटमध्ये नोकरी पकडली आणि एका उद्योगाचे ते सल्लागार बनले. पण ज्या गावाला जायचे नव्हते त्याचा गावाची बस मणिरत्नम यांनी पकडली होती.
मणिरत्नम या क्षेत्रात योगायोगाने आले असेही आपण म्हणू शकतो. त्यांचा अत्यंत जवळची मित्र रवि शंकर अनु पल्लवी अनु हा कन्नड चित्रपट बनवत होते. रवि शंकर यांना मणिरत्नम यांच्यातील कथा सांगण्याची क्षमता माहिती असल्यामुळे त्यांनी चित्रपटाची पटकथा लिहिण्याचा आग्रह धरला. मित्रप्रेमापोटी मणिरत्नम यांनी ती कथा लिहिली आणि या चित्रपटाने त्यांच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीचे दार उघडे केले. या चित्रपटाला कर्नाटक राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केले. मणिरत्नम यांचे हे पहिलेच यश त्यांना महान दिग्दर्शक बनवणारे ठरले.
पहिल्या यशानंतर सिनेक्षेत्राकडे मणिरत्नम गांभीर्याने पाहू लागले. त्यांनी तमिळ चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती 'मौंगा रंगम' या त्यांच्या तमिळ चित्रपटामुळे. त्यानंतर त्यांनी कमल हासन यांना घेऊन १९८७ मध्ये लायकन हा चित्रपट बनवला आणि या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. त्याकाळात वेगळ्या धाटणीचे सिनेमा बनवणारे मणिरत्नम प्रेक्षकांना आवडू लागले. त्यांनी राजकीय नाट्य, दहशतवाद, सूडनाट्यापासून ते छान प्रेमकथापर्यंत नानाविध विषय हाताळले.