मुंबई- 'ओ माय गॉड २' चित्रपटाबद्दलची क्रेझ गेल्या काही महिन्यापासून वाढली होती. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीचे चाहते 'ओएमजी २ ' ची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर चित्रपट झळकला आणि आणि पहिल्या दिवशीचा पहिला खेळ पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर समाधानही पाहायला मिळाले. या चित्रपटात पहिल्यांदाच लैंगिक शिक्षणाचा फारसा स्पर्श न झालेला मुद्दा हाताळण्यात आला आहे. 'ओ माय गॉड २ ' हा चित्रपट लैंगिक शिक्षणावरील कोर्टरूम ड्रामा आहे. यामध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांनी आपल्या भूमिका चोख वटवल्या आहेत.
'ओ माय गॉड २' चित्रपटाची स्पर्धा आजच रिलीज झालेल्या सनी देओलच्या 'गदर २' शी आहे. बॉक्स ऑफिसवर अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पिछाडीवर असूनही अक्षयच्या 'ओएमजी २' ने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची किमया करुन दाखवली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्यानंतर अमित रायच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले जात आहे.
'ओ माय गॉड २' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक यांनी पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शिवाच्या संदेशवाहकाच्या भूमिकेत आहे, तर पंकज त्रिपाठी हा महादेवाचा भक्त आहे. पंकजने , कांती शरण मुद्गल नावाचा सामान्य माणूस आपल्या सहज अभिनयाने दमदारपणे साकाराला आहे. यात अभिनेत्री यामी गौतमने अॅटर्नी संजना त्रिपाठीची भूमिका साकारली आहे.
सर्वच कालाकारांनी आपल्या पात्रांना उत्तम न्याय दिल्याने चाहते प्रभावित झाले आहेत आणि जोरदार प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, ' 'ओएमजी २' रिव्ह्यु : अक्षय कुमारने शिवाचा दूत म्हणून अत्ंयत प्रभावी काम केले आहे. त्याचा हा एक सर्वोत्तम अभिनय आहे. 'टॉयलेट एक प्रेम कथा' आणि 'पॅडमॅन' नंतर 'ओ माय गॉड'सारखे चित्रपट बनवणारा तो एक साहसी अभिनेता आहे. या चित्रपटातील त्याचे काम उत्कृष्ट झाले आहे.'
अक्षयचे कौतुक करताना आणखी एकाने ट्विटमध्ये लिहिले, 'अनंत अडथळे, 'ए' प्रमाणपत्र मिळाले असताना 'गदर २' शी स्पर्धा आणि कमी स्क्रिन्स मिळाले असताना कठीण स्पर्धेत अक्षय कुमारची स्टार पॉवर कुणीही रोखू शकत नाही, हे त्याने पुन्हा सिद्ध केले आहे. तो भारताचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे.'