मुंबई - 'गदर 2' आणि 'ओ माय गॉड 2' हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यामुळे ११ ऑगस्ट रोजी या दोन मोठ्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर मुकाबला सुरू झाला. या वर्षीची ही सर्वात मोठी बॉक्स ऑफिस टक्कर आहे. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही चित्रपटाच्या प्रतिष्ठित फ्रँचायझी एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.
'गदर 2' मध्ये सनी देओल पुन्हा एकदा त्याचे गाजलेले तारा सिंग हे पात्र साकारत आहे. यात त्याने २००१ मध्ये 'गदर: एक प्रेम कथा' मध्ये साकारलेल्या भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे. यात अमिषा पटेलनेही तिची सकीना ही व्यक्तीरेखा पुन्हा सादर केली आहे.
'गदर २' ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. उत्तर भारतामध्ये चित्रपटाला दणदणीत प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. ट्रेड पंडितांच्या अंदाजानुसार 'गदर २' ने पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई केली आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' चित्रपटाला अंदाजे ३६०० स्क्रिन्स मिळाले आहेत. १०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने 'U/A' सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटाची एकूण लांबी १७० मिनीटे असून भारतात पहिल्या दिवशी ३५ कोटीची कमाई होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, 'ओह माय गॉड 2' हा अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टाटर चित्रपटाला 'ओएमजी २' च्या तुलनेत कमी स्क्रिन्स मिळाले आहेत. बॉक्स ऑफिसवर मिळालेला प्रतिसाद प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत तोकडा असून चित्रपटाने भारतात सुमारे ९ कोटींची कमाई पहिल्या दिवशी केल्याचा अंदाज आहे. १५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट १६०० स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला भारतीय सेन्सॉरने 'ए' सर्टिफिकेट दिले असल्यामुळे मुलांना थिएटरमध्ये प्रेवश दिला जात नाही. विशेष म्हणजे सौदे अरेबिया आणि ओमान सारख्या मार्केटमध्ये तिथल्या सेन्सॉर बोर्डाने १२ वर्षावरील मुलांना चित्रपट पाहण्यास संमती दिली आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल अभिनीत 'ओ माय गॉड' चित्रपटाच्या या सीक्वेलमध्ये अक्षयसोबत पंकज त्रिपाठीची एन्ट्री झाली आहे. सामाजिक संदेश देण्यात यशस्वी ठरलेल्या 'ओएमजी २' चित्रपटाची लांबी १५६ मिनीटांची आहे.
हेही वाचा -
१.Omg 2 Twitter Review: 'ओएमजी २' च्या कथेने जिंकली प्रेक्षकांची मने, अक्षय आणि पंकज त्रिपाठीवर चाहते फिदा
२.Gadar 2 Twitter review : 'गदर २' वरुन सनी देओल चाहत्यांची विभागणी, काहींना वाटला ब्लॉकबस्टर तर काही झाले निराश
३.Gadar 2 Advance Booking : 'गदर 2'च्या अॅडव्हान्स बुकिंगला अभूतपूर्व प्रतिसाद, २ लाख तिकीटांची झाली विक्री