मुंबई - Old womens dance on Jawan song : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला देशभर तुफान प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक आणि प्रेक्षक यांनी चित्रपटाबद्दल साकारात्मक मतं व्यक्त केल्यानं प्रेक्षकांचा ओघ थिएटरच्या दिशेने वाढतोय. या चित्रपटातील गाण्यांनाही लोक उत्तम प्रतिसाद देताहेत. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी गायलेल्या जिंदा बंदा या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अनिरुद्ध रविचंदरने सध्या X म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीच्या ट्विटर खात्यावर 'चलेया' गाण्याचे पोस्टर शेअर केलं आहे. याला शाहरुख खाननेही प्रतिसाद दिला असून त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये मुखपृष्ठ बनवणाऱ्या कलाकाराचे कौतुक केलं आहे.
शाहरुख खान सध्या 'जवान' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याच्या X हँडलवर अभिनंदन करणाऱ्या चाहत्यांना प्रतिसादही देत आहे. शुक्रवारी शाहरुख खानने गायक अनिरुद्ध रविचंदरने शेअर केलेली चलेया गाण्याच्या कव्हरची पोस्ट कोट केली.
शाहरुख खानने 'चलेया'च्या मुखपृष्ठाचे कौतुक केले आणि ट्विट केले की, 'तू जर गायलंस तर यावर डान्स करेन, बेटा. आणि मी जर चुकीची स्टेप करत असेन तर तू तुझी लगेच तुझी लय बदलं त्यामुळे मी नाचताना चांगला दिसेन. तूच तशा प्रकारची जादु करु शकतोस'. असे शाहरुखने लिहिताच त्याला उत्तरादाखल अनिरुद्ध चंदरने 'लव्ह यू किंग', म्हणत हसून प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेप्रेमींपासून ते सर्व थरातील अबाल वृद्ध प्रेक्षकांना 'चलेया' गाण्याने वेडं केलंय. या ट्रेंडिंग गाण्यावर चाहते डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ६५ वर्षांची एक महिला जीन्स आणि स्नीकर्सच्या जोडीसह टी-शर्टवर चेकर्ड शर्टवर उत्तम डान्स करताना दिसत आहे. तिने शाहरुखने साकारलेल्या डान्स हुक स्टेप्स तंतोतंत करताना दिसतेय.