मुंबई - Nushrratt Bharuccha : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं 7 ऑक्टोबर रोजी अचानक इस्रायलवर हल्ला केला, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अनेक लोकही याठिकाणी अडकले आहेत. इस्रायलमध्ये युद्धाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाचे नावही या यादीत सामील झाले आहे. आता नुसरत भारतात सुखरूप परतली. नुसरत रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडताना दिसली. यावेळी ती खूपच घाबरलेली दिसली होती. दरम्यान आज नुसरतनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं इस्रायलमधील परिस्थिती सांगितली आहे.
इस्रायलहून परतल्यानंतर नुसरत भरुचानं केला व्हिडिओ शेअर : व्हिडिओमध्ये नुसरत भरुचानं सांगितलं, 'ज्यांनी माझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. मी परत आलो आहे. मी घरी आहे. मी सुरक्षित आहे. मी ठीक आहे! पण दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी हॉटेल तेल अवीवच्या खोलीतून जागे झाले, तेव्हा मला फक्त बॉम्ब पडण्याचा आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर आम्हाला तातडीने तळघरात नेण्यात आले. याठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद होते. मी याआधी अशा परिस्थितीत कधीच नव्हते, पण आज जेव्हा मला माझ्याच घरात जाग आला. तेव्हा कोणताही आवाज नाही, कोणतीही भीती न बाळगण्याचे कारण नाही. याशिवाय जवळ कोणताही धोका नसल्याची भावना ही होती. या गोष्टीची मला जाणीव झाली आहे. आपण किती भाग्यवान आहोत, आपण अशा देशात आहोत जिथे आपण सुरक्षित आणि संरक्षित आहोत. आपण थोडा वेळ काढून भारत सरकारचे आभार मानले पाहिजेत. भारतीय दूतावास आणि इस्रायल दूतावासाचे आभार मानले पाहिजेत. ज्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे राहू शकतो. मी खूप भाग्यवान आहे की मी या देशात आहे, आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असायला हवा.