मुंबई - Ileana DCruz Relationship : इलियाना डिक्रूझ हिला ऑगस्ट महिन्यात कोआ फिनिक्स डोलन नावाचा मुलगा झाला. मुलाच्या जन्मापर्यंत तिने कोणाशी लग्न केलंय याबद्दल अथवा तिच्या रिलेशनशीपबद्दल गुप्तता पाळली होती. एका मुलाखतीत तिला जेव्हा ती सिंगल मदर म्हणून मुलाचं संगोपन कसे करते असे विचारताच तिने जोडीदार मायकेल डोलनचे नाव घेतले आणि तो मदत करतो हे सांगायला विसरली नाही. त्यानंतर काही फोटोही शेअर करत आपल्या बाळाचा बापही मायकेल डोलन असल्याचे स्पष्ट केले होते.
ती जेव्हा गर्भवती होती तेव्हाही तिने जोडीदार मायकेल डोलनचे नाव घेतले नव्हते. सध्या ती मुलासह मायकेलसोबत युएसमध्ये राहात आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने प्रसूतीनंतरच्या नैराश्याची वास्तविकता उघड केली आणि मजबूत समर्थन प्रणालीची आवश्यकता अधोरेखित केली. मातृत्वाच्या आव्हानांवर चर्चा करताना, तिने भावनांचा आवेग आणि 'मॉम गिल्ट'च्या अनुभवाबद्दलही सांगितले. यावेळी इलियानाने मायकेलची प्रशंसा केली आणि सांगितले की, तो एक विलक्षण जोडीदार आहे जो तिला सर्व प्रकारच्या संकटातून सुखरूप बाहेर येण्यासाठी नियमित साथ देतो.
आपल्या मातृत्वाबद्दलचा दृष्टीकोन सोशल मीडियावर शेअर केल्यानंतरही आपल्या जोडीदाराबद्दलचा तपशील सांगताना इलियाना सावधगिरी बाळगताना दिसली. मे 2023 मध्ये मायकेलशी तिच्या कथित लग्नाबद्दल विचारले असता, तिने गुप्तता राखणे पसंत केले. "त्यात बऱ्याच गोष्टींचा गुंता आहे त्यामुळे ते सोडून देऊयात. थोडसं गूढ असणं कधीही छान असतं नाही का? प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या आयुष्याबद्दल कितीपत बोलायचं हे मी अद्याप ठरवलेलं नाही. यापूर्वी मी जेव्हा माझ्या रिलेशनशीपबद्दल बोलले होते आणि त्याचा काय परिणाम झाला त्या अनुभवावरुन या निर्णयापर्यंत पोहोचले आहे.," असे इलियाना म्हणाली.