मुंबई - विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ होते. गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. जरी त्यांचं शरीर अनंतात विलीन झालं असलं तरी त्यांच्या कलाकृतींमधून ते अजरामर आहेत. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वानं अनेकांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यांच्या शिकवणींतून अनेक कलाकार घडत गेले. प्रतिकूल परिस्थितीही सकारात्मक राहणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्यापाशी होता. वयोमानानुसार त्यांच्या शारीरिक व्याधी वाढल्या होत्या परंतु त्यांनी काम करणं सोडलं नाही. त्याच सुमारास विक्रम गोखले यांनी 'सूर लागू दे' हा चित्रपट केला. त्यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर त्यांची पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या उपस्थितीत अनावरीत करण्यात आले. येत्या १२ जानेवारी २०२४ मध्ये हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
पोस्टर प्रदर्शनासाठी नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेता पद्मश्री मनोज जोशी आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला रीना मधुकर, 'कलियों का चमन...' फेम मेघना नायडू, अनिल कालेलकर, मनोज पाखाडे, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, यांनी हजेरी लावली होती. ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज याचे वितरण करणार आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकारांची मोट जुळली असून या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, असं दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांचे मत आहे. ते म्हणाले की, 'आयुष्याच्या संध्याकाळचे एक विलोभनीय चित्र या सिनेमात दर्शविण्यात आले असून हा चित्रपट मनोरंजनासोबतच प्रबोधनही करेल. सामाजिक जाणीवेचं भान राखून याची आखणी केलेली असून या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. संगीतची बाजू सांभाळली आहे पंकज पडघन यांनी. रीना मधुकर आणि मेघना नायडू या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहेत. त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.'
'सूर लागू दे' हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.