मुंबई - यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी गर्दी करू लागलेत. कोरोना कालखंडात अनेक चित्रपटांची शूटिंग आणि प्रदर्शन गणितं बिघडली होती. परंतु चित्रपटसृष्टीची गाडी पुन्हा रुळावर आली असून मराठी चित्रपटदेखील मोठ्या संख्येने प्रदर्शित होताना दिसताहेत. आगामी चित्रपात सर्ज चे प्रोमोशन जोरात सुरु असून त्या चित्रपटातील 'जीव तुझा झाला माझा...', 'धड धड...' आणि 'संगतीनं तुझ्या...' ही गाणी प्रकाशित झाल्यापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता सर्जाच्या निर्मात्यांनी त्या चित्रपटाची चित्रझलक नुकतीच प्रकाशित केली असून त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ट्रेलर रिलीज केल्यानंतर लगेचच त्यावर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे आणि ही एका अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीसाठी सकारात्मक बाब आहे. अर्थात टिझर आणि ट्रेलर ला मिळणारा प्रतिसाद चित्रपटाला सिनेमागृहातही मिळावा अशी अपेक्षा निर्माते बाळगून आहेत.
ग्रामीण प्रेमकथा असलेला चित्रपट - सर्जाचे दिग्दर्शन धनंजय खंडाळे यांनी केलं असून या चित्रपटातून प्रेमाच्या विविध छटा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. या सिनेमातून प्रेमाचे विविध पैलू अनुभवायला मिळतील तसेच प्रेमाचे बदलते रंग चित्रपटाच्या कथानकाला अजूनही रंगतदार बनवेल असे दिग्दर्शकाचं मत आहे. प्रेमाच्या विविधांगी छटा आणि कठीण प्रसंगांमध्येही डगमगून न जाता खुलून येणारं खरं प्रेम हे 'सर्जा' चित्रपटाचं ‘युएसपी’ ठरेल असा विश्वास निर्माते व्यक्त करताना दिसतात. ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर दिग्दर्शक धनंजय खंडाळे म्हणाले की, 'प्रेमकथा हा आपल्या सिनेमांचा आधारस्तंभ आहे. आजवर अनेक चित्रपटांतून अनेक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आल्या परंतु सर्जा मधील प्रेमकथा अतिशय अनोखी आहे. प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रत्येकाला अनुभवायला मिळते आणि जरी प्रेम हे एक बंधन असले तरी ते कोणत्याही बंधनात बांधता येऊ शकत नाही. प्रेम म्हटलं की त्याला विरोध असणारे आलेच, परंतु सर्जा मधील प्रेमी युगुल कितीही संकटं आली तरी त्यावर मात करण्याची शक्ती प्रेमात असते हे पटवून देण्यात यशस्वी होतील. 'सर्जा'मधील प्रेमकथा ही एक सांगीतिक प्रेमकथा असून त्यातून प्रेमाची नवी व्याख्या मांडलेली दिसून येईल.'
सामाजिक विषयावरील चित्रपट सर्जा - 'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, त्याची प्रस्तुती केली आहे राजवर्धन फिल्म्स क्रिएशनने. चित्रपटाच्या सहनिर्मितीची धुरा वाहिली आहे रमेश रंगराव लाड आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील यांनी. धनंजय मनोहर खंडाळे दिग्दर्शित सर्जाची बलस्थानं आहेत, श्रवणीय गीत-संगीत, सपक पार्श्वसंगीत, समकालीन दिग्दर्शन, नैसर्गिक अभिनय, अनोखे कथानक आणि अर्थपूर्ण संवाद तसेच नेत्रसुखद लोकेशन्सवरील छायांकन. तसेच रोहित चव्हाण आणि ऐश्वर्या भालेराव यांची एकदम फ्रेश जोडी चित्रपटात रोमान्स करताना दिसेल. हा चित्रपट मनोरंजनासोबत सामाजिक विषयांनाही हात घालताना दिसेल अशी ग्वाही दिग्दर्शक देतो.