मुंबई Netflix Delete Annapoorani :प्रसिद्ध चित्रपट निर्माता क्रिस्टोफर कनकराज यांनी नुकतीच एक पोस्ट एक्सवर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्री नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरून हटवण्यात आल्याचं सांगितलं. 'अन्नपूर्णी' चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ओटीटीवर एका आठवड्यापूर्वी रिलीज झाला होता. आता या चित्रपटाचं स्ट्रीमिंग थांबवण्यात आलं आहे. हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी त्यांच्या तक्रारीत दावा केला आहे की, हा चित्रपट हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे. मुंबई पोलिसांनी तक्रार मिळाल्याचं स्पष्ट केलंय. त्याचवेळी तक्रारदारानं पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेता येईल असं म्हटलंय.
'अन्नपूर्णी' काढून टाकण्याचा नेटफ्लिक्सला इशारा : अन्नपूर्णीतील भावना दुखावणाऱ्या डायलॉगमुळे अभिनेत्री नयनतारा, अभिनेता जय, लेखक-दिग्दर्शक नीलेश कृष्णा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोयंका, झी स्टुडिओचे मुख्य अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या प्रमुख मोनिका शेरगिल यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष सुरू असताना, झी स्टुडिओज, नाद एस स्टुडिओज निर्मित 'अन्नपूर्णी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 'अन्नपूर्णी' चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलेश कृष्णा यांनी मात्र समर्थन केलं आहे. तर रमेश सोलंकी यांच्याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते श्रीराज नायर यांनीही नेटफ्लिक्सला चित्रपट काढून टाकण्याचा इशारा दिला होता.