मुंबई :शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. चार वर्षांनंतर किंग खान मोठ्या पडद्यावर परतला आहे. 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर आता प्रेक्षक त्याला 'जवान'मध्ये अॅक्शन करताना पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. यापूर्वी 'जवान' चित्रपटाचा प्रीव्हयू रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या प्रीव्हयूला खूप प्रेक्षकांनी पसंत केले होते. प्रीव्हयूमध्ये सर्वांनी शाहरुखला पूर्णपणे वेगळ्या अंदाजात पाहिले होते. दरम्यान चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची सुपरस्टार नयनताराही दिसणार आहे. सोमवारी शाहरुखने इंस्टाग्रामवर 'जवान' चित्रपटामधील नयनताराचे अत्यंत स्टायलिश पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये नयनतारा ही अॅक्शन लूकमध्ये दिसत आहे.
डॅशिंग लूक : पोस्टरमधील अॅक्शन लूकमध्ये नयनतारा कॉपच्या गणवेशात हातात एक बंदूक पकडून आहे. नयनताराचे पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिले, 'ती वादळापूर्वीची गर्जना आहे!' आताच पाहा तिचा लूक! 'जवान' (#Jaawan) ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.,' असे त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितले. या पोस्टरमध्ये नयनतारा ही खूपच डॅशिंग दिसत आहे. 'जवान' चित्रपटात ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तसेच चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणही खास भूमिकेत दिसणार आहे.