मुंबई- हिंदी सिनेसृष्टीत अष्टपैलू भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच संघर्षातून पारजून निघाला आहे. करियरच्या सुरुवातीपासून सुरू असलेला त्याचा संघर्ष आजही वेगळ्या अर्थाने स्वःआयुष्यात जारी आहे. सध्या त्याच्यापासून त्याची पत्नी दुरावली आहे. भाऊबंदकीचा शाप त्यालाही लागलाय. अनेक वादग्रस्त आरोपांना व न्यायालयीन लढाईला तो सध्या सामोरे जाणारा नवाजुद्दीन १९ मे रोजी आपला ४९ वा वाढदिवस साजरा करतोय.
अभिनय कारकीर्दीची खडतर सुरुवात- नवाजुद्दीनने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात १९९९ साली प्रदर्शित झालेल्या सरफरोश चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेने केली होती. शूल या सिनेमात तर त्याच्या वाट्याला अतिशय दुर्लक्षित अशी भूमिका आली. पण तो प्रॉडक्शन हाऊसच्या चक्करा मारणे थांबवत नव्हता. २००३ मध्ये आलेल्या मुन्ना भाई एमबीबीएस सिनेमात त्याने एका मामुली पाकिटमारची भूमिका केली. पण या सर्व भूमिका छोट्या होत्या पण त्यातील नवाजची छबी अजूनही आपण विसरु शकत नाही. २०१२ मध्ये अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपट मालिकेतील त्याच्या व्यक्तीरेखेने प्रेक्षकांसह समीक्षकांचे लक्ष वेधले आणि त्याच्या लोकप्रियतेला आधार तयार झाला. आजच्या घडीला नवाझुद्दीनला हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखले जाते.
गँग्स ऑफ वासेपुरनंतर गाडी रुळावर आली - हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना एकदा नवाझुद्दीनने सांगितले होते की, तो सुरुवातीची १२ वर्षे काम मिळण्यासाठी झगडत होता. २०१२ मध्ये 'गँग्स ऑफ वासेपुर' आणि त्यानंतर आलेल्या 'कहानी', 'तलाश' 'आणि इतर चित्रपटांनी त्याचा वनवास संपवला. यातून तो बरेच काही शिकला आणि त्याचा उपयोग त्याला पुढच्या कारकिर्दीमध्ये झाला.