नवी दिल्ली- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा काल दिल्लीत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी अभिनेत्री आशा पारेख यांना सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल २०२० या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कारान प्रदान करण्यात आला. पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगण याला देण्यात आला. सूरराय पोत्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या याचीही गौरव करण्यात आला.
याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. किशोर कदम यांना (गोदाकाठ, अवांछित) या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मराठी कलावंतांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उठवला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या प्रमुख भूमिका असेलल्या 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॉन फिचर्स फिल्म या विभागात कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट 'फनरल'ची निवड करण्यात आली.