मुंबई - Jawan and The vaccine war:राष्ट्रीय सिनेमा दिवस 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या खास दिवशी शाहरुख खान आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट देणार आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त शाहरुख हा त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' फक्त 99 रुपयांमध्ये प्रेक्षकांना दाखवणार आहे. 2023 मध्ये बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालंय. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्तानं देशभरात 4000 सिनेमागृहामध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. याशिवाय 'जवान' चित्रपट 99 रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे शाहरुखचे चाहते खूप खुश आहेत. 'जवान' 7 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं आतापर्यंत 1100 कोटींहून अधिकचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे.
शाहरुख खाननं दिली चाहत्यांना भेट :आता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी नॅशनल सिनेमा डे 2023 ला मोठ्या ऑफरसह 'जवान' चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला असून 'द व्हॅक्सीन वॉर'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही राष्ट्रीय सिनेमा दिनी प्रेक्षकांना आपला चित्रपट स्वस्तात दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता शाहरुख खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'जवान'चं पोस्टर शेअर करत लिहलं, 'राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त तुम्हा सर्वांसाठी एक खास भेट, फक्त सिनेमाच्या प्रेमासाठी, या 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहामध्ये जा आणि 99 रुपयांमध्ये 'जवान' चित्रपट पहा'. असा त्यानं चाहत्यांना संदेश दिला आहे.