महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

MI Vasantrao : नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत ‘मी वसंतराव' चे ट्रेलर प्रदर्शित! - undefined

जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'मी वसंतराव' या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

MI Vasantrao

By

Published : Apr 3, 2022, 1:57 PM IST

मुंबई :सध्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वास्तविकतेच्या जवळ जाणारी कथानकं हाताळली जाताहेत. त्याच मार्गावर चालताना अनेक ‘बायोपिक’ सुद्धा बनताना दिसताहेत. मराठी शास्त्रीय संगीतातील एक मोठे नाव म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चित्रपट बनला असून नुकतेच त्याचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, राहुल देशपांडे, अनिता दाते, सारंग साठ्ये, कौमुदी वालोकर, अमेय वाघ यांच्यासह सुबोध भावे, हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी आदी कलाकार उपस्थित होते.

MI Vasantrao
या चित्रपटातून वसंत देशपांडेपासून पंडित वसंतराव देशपांडेंपर्यंतचा प्रवास उलगडणर आहे. पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. तुमचं घराणं कोणतं, या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वताःला त्यांच्या गायकीतून सिद्ध केलं.

पु.ल म्हणायचे मोठी माणसे ...
वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे. परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, त्यांच्या सांगितिक प्रवासाविषयी कमी माहिती आहे. आणि नेमका हाच प्रवास 'मी वसंतराव' या चित्रपटाद्वारे मध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वसंतरावांची गोष्ट म्हणजे अक्षरशः अनेक अडथळ्यांवर, संकटांवर आणि अपमानांवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकाराच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि प्रमुख पाहुणे नाना पाटेकर 'मी वसंतराव'च्या ट्रेलर लाँच निमित्ताने म्हणाले, ''पु. ल. देशपांडे म्हणायचे, मोठी माणसं जात नसतात. ती संगीत रूपानं चिरंतन राहतात. हे वाक्य वसंतरावांच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. वसंतरावांना भावगीत, ठुमरी, नाट्यगीत, गझल, लावणी अशा सगळ्याच प्रकारची गायकी यायची. गायकी त्यांच्या नसनसात भिनलेली होती. त्यांचा साहित्याचा अभ्यासही अफाट होता. मी वसंतरावांना भेटलो आहे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानं एक व्यक्ती म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले. 'मी वसंतराव' बद्दल बोलायचं तर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि तो इतका अप्रतिम आहे की, अनेकदा मी हा चित्रपट पाहू शकतो. संगीतातील मला फारसं काही कळत नाही. त्यामुळे त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही. मात्र हा मराठीतील एक उत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. राहुल संगीत उत्तमच सादर करणार याची मला खात्री होतीच, मात्र एक कलाकार म्हणूनही राहुल सर्वोत्कृष्ट असल्याचं त्यानं सिद्ध केलं आहे. चित्रपटातील प्रत्येकानंच अप्रतिम कामं केली आहेत.”

तगड्या कालकारांची फौज
राहुलने घेतलेली मेहनत आपल्याला आतापर्यंत दिसली आहेच. पण अमेय वाघ (दीनानाथ मंगेशकर), पुष्कराज चिरपुटकर (पु. ल. देशपांडे), अनिता दाते (वसंतरावांची आई), कौमुदी वालोकर (वसंतरावांची पत्नी), दुर्गा जसराज (बेगम अख्तर) यांच्यासह सगळ्याच कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून त्यांना योग्य न्याय दिला आहे.” जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'मी वसंतराव' या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -Malaika Arora Car Accident : अभिनेत्री मलाइका अरोराच्या गाडीचा अपघात; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details