मुंबई - Nana Patekar interview : नाना पाटेकर म्हणजे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील भारदस्त व्यक्तिमत्व. त्याने आपल्या जबरदस्त अभिनय प्रतिभेनं दबदबा निर्माण केलेला आहे. चित्रपटाशी निगडित प्रत्येकाने प्रामाणिकपणे उत्तम काम करावं हा त्यांचा नेहमीच अट्टहास राहिला आहे. जितका संवेदनशील अभिनेता तितकाच प्रेमळ स्वभाव असलेल्या या अभिनेत्याला काहीही थातुर मातुर केलेलं आवडत नाही. अलीकडच्या काळात नाना चित्रपटांतून फारसा दिसला नाही. बऱ्याच काळानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेला 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी नाना पाटेकरशी संवाद साधला आणि त्याला बोलतं केलं.
बऱ्याच कालावधीनंतर तुमचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' बद्दल काय सांगाल?
सर्वात महत्वाचं म्हणजे असा चित्रपट करावासा वाटला याबद्दल लेखक, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा चित्रपट प्रत्येक भारतीयाचा आपल्या देशाबद्दलचा अभिमान वृद्धिंगत करेल. बलराम भार्गव जे व्हॅक्सिन टीमचे प्रमुख होते. व्हॅक्सिन तयार करताना गुप्तता बाळगली होती आणि अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली होती. आपल्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत जगासमोर आणणे गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पण आपल्या शास्त्रज्ञांनी नेटाने व्हॅक्सिन बनवलं आणि त्याचा भारताबरोबर इतर अनेक देशांना कोरोना लढ्यात फायदा झाला.
तर, विवेक (अग्निहोत्री) हे स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला विचारलं की मीच का? त्यावर तो उत्तरला की, यात एक वाक्य आहे, इंडिया कॅन डू इट आणि हे वाक्य तूच कन्विन्सिंगली बोलू शकशील. मी लगेच होकार दिला. परंतु यात बऱ्याच सायंटिफिक गोष्टी आहेत, असं मी सांगितल्यावर त्याने दिलासा दिला, 'मी आहे ना'. मी संपूर्ण चित्रपट त्याच्यावर भिस्त ठेऊन केला. तसंच मी ज्यांची भूमिका करतोय डॉ बलराम भार्गव, त्यांना मी भेटलोही नाही. एकतर वेळ नव्हता आणि मला त्यांना भेटून भूमिकेचं माझ्या मनातलं चित्र धूसर करायचं नव्हतं.
आम्ही हल्लीच त्यांना हा चित्रपट दाखवला आणि ते खूप इम्प्रेस झाले. मला त्यांनी विचारलं की मला न भेटता तुम्ही एवढी प्रभावी व्यक्तिरेखा कशी साकारली? मी फक्त विवेककडे बोट दाखवले आणि म्हणालो, सगळं श्रेय याला जातं. आमच्याकडे ७-८ महिने असते तर मी नक्की त्यांना भेटलो असतो. त्यांची देहबोली अथवा बोलण्याची पद्दत कॉपी करण्यासाठी नव्हे तर त्यांची वैचारिक मानसिकता जाणून घेण्यासाठी.
तुमचा कोरोना कालखंडाचा अनुभव काय होता?
कोरोना काळ खूप वाईट होता. एकमेकांकडे जाणं येणं बंद होते. परंतु मी मात्र प्रवास केला. 'नाम फाउंडेशन'च्या कामानिमित्त बाहेर जाणं होत होतं. मी बिहारलाही जाऊन आलो. मी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी बिहारला गेलो होतो. मला तर ६ - ७ वेळा कोरोना होऊन गेला. एकदाच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याकडील पाहुण्याची खूप सरबराई केली की तो जास्त काळ राहतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की लगेच निघून जातो. कोरोनाबाबतही मी हेच केलं.
तुम्ही 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट केलाय. तुम्ही स्वतः व्हॅक्सिन घेतलं का?
हो. दोन्ही डोस घेतले. अर्थात मी घेण्यासाठी राजी नव्हतो. कारण मला माझ्या शरीराची प्रतिकारशक्ती जोखायची होती. पण माझा मुलगा घाबरला होता आणि साहजिकच आहे. कारण त्यावेळेला असेही दाखवत होते की, मेल्यावर पार्थिवही नातेवाईकांना दिलं जात नव्हतं. मुलाच्या आग्रहाखातर मी व्हॅक्सिन घेतलं.