३ राष्ट्रीय पुरस्कार आणि ३ फिल्मफेयर अवॉर्ड्स मिळविणारा सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती सध्या अधनं मधनं चित्रपटांतून दर्शन देतो. ‘द ताश्कंद फाईल’ आणि ‘द कश्मीर फाईल्स’ मधून हल्लीच झळकलेले मिथुन चक्रवर्ती आता अजून एका चित्रपटात दिसून येणार आहेत. आगामी बॅड बॉय या चित्रपटात त्यांनी एक गाणं केलं असून तो सिनेमा करण्यामागे एक भावनिक कारण सुद्धा आहे. मिथुन सारख्या स्टार्सनी त्यांच्या स्टारडमच्या काळात अनेकांसाठी अनेक चित्रपट केलेले आहेत तेही कधी कधी फुकटात. परंतु बॅड बॉय मधून मिथुन यांचे धाकटे चिरंजीव नामोशी चक्रवर्ती (Namashi Chakraborty ) चित्रपटसृष्टीत दाखल होताहेत. त्यांनी त्याच्या अभिनय पदार्पणाला थोडासा हातभार लावला आहे. नामोशी सुपरस्टार अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री योगिता बाली यांचा मुलगा आहे. खरंतर नामोशी नेपोटीझमचा शिकार झाला असता परंतु त्याने जेव्हा आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांची भेट घेतली तेव्हा सांगितले की, ‘हा सिनेमा मी माझ्या कर्तृत्वावर मिळविला आहे.’
तुला बॅड बॉय हा सिनेमा कसा मिळाला?
खरं सांगायचं म्हणजे हा सिनेमा मी कोणाचीही मदत न घेता मिळविला आहे. त्याचे झाले असे की काही वर्षांपूर्वी माझ्या गर्लफ्रेंडने मला एक प्रश्न विचारला. ‘तू जेव्हा मला प्रोपोज करशील तेव्हा तू स्वतः नाव कमावून नामोशी चक्रवर्ती म्हणून करशील की मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा म्हणून करशील?’ या स्टेटमेंटने माझे डोळे उघडले. मी त्यावेळी २४ वर्षांचा होतो आणि मला जाणवले की मला आयुष्यभर मिथुन चक्रवर्तीचा मुलगा म्हणून वावरायचे नाहीये. आणि त्यासाठी स्वतःची ओळख बनविणे गरजेचे आहे तेही घरच्यांची मदत न घेता. मी लगेचच, अगदी दुसऱ्या दिवसापासून, कामाच्या शोधला लागलो. त्यावर्षी मी ३६५ दिवसांमधील ३६४ दिवस ऑडिशन्स दिल्या. १ दिवस सोडला कारण तो माझा वाढदिवस होता (मंद स्मित करीत). मधल्या वेळात मी स्टॅन्ड अप कॉमेडी शोज करीत होतो. कॉमेडी मुंबई तर्फे मी तीनेक वर्षे लाईव्ह शोज केले आणि तेही स्क्रिप्ट वगैरे नसताना. त्याचा मला खूप फायदा झाला. माझ्यात सेल्फ कॉन्फिडन्स आला तसेच माझे कॉमेडी टाईमिंग सुंदर झाले. अर्थात चित्रपट मिळविण्यासाठीचे माझे प्रयत्न सुरूच होते.
एके दिवशी असाच मी निर्माते साजिद कुरेशी यांच्या ऑफिसला गेलो होतो. त्यांनी विचारले की सध्या काय चालू आहे. मी म्हणालो की पिक्चर मध्ये काम शोधतोय. तेव्हा ते मला म्हणाले की, ॲक्शन चित्रपट करायचा आहे का? मी तात्काळ नाही म्हणालो आणि सांगितले की मला कॉमेडी करायची आहे. ते अचंबित झाले कारण पदार्पणात कॉमेडी चित्रपट करणे म्हणजे जोखमीचे काम. अनेक कलाकार थोडे एस्टॅब्लिश झाल्यावर कॉमेडीला हात घालतात. परंतु मी सांगितले की मला कॉमेडी करायची आहे. त्यावर ते म्हणाले, ओके, मी तुला कॉल करेन. ‘आय/ व्ही विल कॉल यु’ हे डेंजर वाक्य आहे, खासकरून चित्रपटसृष्टीत, खासकरून नवोदित कलाकारांसाठी जे निर्मात्यांच्या ऑफिसला भेटी देतात, कारण ९९% ‘तो’ फोन कधी येत नाही.
मी लहानपणापासून लोकांना कॉपी करण्यात एक्सपर्ट आहे. अगदी लहानपणापासून मी माझ्या वडिलांचे चित्रपट पाहून त्यांची नक्कल करीत असे. तसेच शाहरुख खानचा मी खूप मोठा फॅन आहे. त्याची नक्कल मी करीत असे. तसेच गोविंदा यांची नक्कल मी हुबेहूब करीत असे. मी त्यांना देव मानतो. त्यांच्यासारखे कॉमेडी टाईमिंग जवळपास इतर कुणाकडेच नाही असे माझे मत आहे. परंतु मोठा झाल्यावर मी या नकला सोडल्या. माझे वडील मला सांगायचे की, ‘नेहमी तू स्वतःची ओळख निर्माण कर ज्याची इतरांना नक्कल करावीशी वाटेल’. आता माझ्यावर कोणाचाही पगडा नाही. एक दोन हॉलिवूड ॲक्टर्सचा मी चाहता आहे आणि त्यांचे काम बघून प्रेरणा नक्कीच मिळते.
हो तर, माझ्या डेब्यू फिल्म कडे वळतो. साजिद कुरेशी यांच्या भेटीनंतर काही दिवसांनी मला फोन आला की एका दिग्दर्शकाला मला भेटायचे आहे. मला नंतर नाव कळले की राजकुमार संतोषी. पहिल्यांदा विश्वास बसला नाही परंतु दुसऱ्याच दिवशी मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी माझी स्क्रीन टेस्ट घेतली. फोटो शूट झाले. त्यांनी मला दोन सीन्स दिले ज्यात मला स्लॅपस्टिक कॉमेडी करायची होती. खरंतर ते खूप चॅलेंजिंग सीन्स होते. ते संपल्यावर त्यांनी मला लगेचच होकार दिला. मी माझा पहिला चित्रपट साईन केला होता. तो आनंद शेयर करण्यासाठी मग मी घरी फोन केला आणि आई बाबांना सांगितले. बाबा म्हणाले की, ‘तुला उत्तम दिग्दर्शक लाभला आहे. संधीचे सोनं कर.’ महत्वाचं म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही निर्माता वा दिग्दर्शकाला फोन केला नाहीये.