मुंबई- Naal 2 Teaser Released: 'सैराट' चित्रपटाचा छाया चित्रकार सुधाकर रेड्डी यंक्कटी यांनं नागराज मंजुळेच्या सहकार्यानं 'नाळ' या चित्रपटाची निर्मिती केली होती. दुर्गम गावात राहणाऱ्या निरागस चैत्या नावाची मुलाची ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नागराज मंजुळेनं यात चैत्याच्या बाबाची भूमिका साकारली होती आणि आईच्या भूमिकेत होती देविका दप्तरदार. 'नाळ' चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला आणि अनेक पुरस्कारावर आपले नाव कोरण्यात दिग्दर्शकाला यश आले होते. अर्थातच या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा सुधाकर रेड्डी यंक्कटीनंच सांभाळली होती. या चित्रपटाची कथाही सुधाकरची होती आणि त्याचे संवाद नागराज मंजुळेनं लिहिले होते. कलाकारांचा उत्तम अभिनय, दर्जेदार कथानक, उत्कृष्ट फिल्मोग्राफी, सुंदर लोकेशन्स असं गाण्यासकट सगळं काही सर्वोत्तम असलेला 'नाळ' चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला हळुवार स्पर्श करुन गेला होता. 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शनासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही 'नाळ'साठी सुधाकर रेड्डी यंकट्टीला मिळाला होता.
'नाळ' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुधाकरनं याची सीक्वेल बनवण्याचा ध्यास घेतला. एके दिवशी कथा लिहिून त्यानं नागराजला बोलवून घेतलं. 'नाळ'ची पुढील कथा काय असेल हे ऐकण्यासाठी नागराजही उत्सुक होता. ही कथा नागराजला इतकी भारी वाटली की, तातडीनं सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला. 'नाळ 2' च्या नावानं चांगभलं, असं म्हणत नागराजनं सोशल मीडियावर ही बातमीही चाहत्यांना कळवली होती. गेली एकवर्षभर या चित्रपटाची निर्मिती आटपाट या नागराजच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत सुरू होती. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय.
'नाळ 2' ची कथा पहिला भाग जिथून संपला तिथूनच सुरू होते. चैत्यानं गाव सोडलं आणि तो आपल्या खऱ्या आईच्या शोधात गेला होता. आता दुसऱ्या भागात मोठा झालेला चैत्या पुन्हा परतणार आहे. ट्रेलरमध्ये डोंगर दऱ्यांच्यामधून एक एसटी वळताना दिसते आणि त्याच्या खिडकीतून चैत्याचा हात बाहेर येतो. चैत्या पुन्हा आई बाबासोबत राहणार का?, खऱ्या आईचा शोध त्याला लागला का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'नाळ'च्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत. सध्या टीझरवर प्रेक्षक बेहद्द खूश दिसत आहेत. भरपूर प्रतिक्रिया मिळत असून चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू झाली आहे. यंदाच्या दिवाळीला १० नोव्हेंबरपासून ‘नाळ - भाग दोन’ महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.