मुंबई - मराठी चित्रपटांच्या शीर्षकामधे इंग्लिश शब्द असणे फारच ‘कॉमन’ झाले आहे. ‘सॉरी’ हा शब्द इतका वापरला जातो की तो कुठल्या भाषेतील शब्द आहे याचा अनेकांना विसर पडलेला असेल. परंतु एक मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे टायटल आहे ‘आय एम सॅारी'. आजच्या युगात काही इंग्रजी शब्द आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. बऱ्याचदा अनाहुतपणे हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जातात. 'सॅारी' हा असाच एक शब्द आहे, जो आज अगदी आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. रसिकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या 'आय एम सॅारी'च्या ट्रेलरला फार कमी अवधीमध्ये भरभरून लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत.
या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन दीपक भागवत यांनी केलं आहे. यापूर्वी '३:५६ किल्लारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे दीपक भागवत 'आय एम सॅारी' माध्यमातून पुन्हा एकदा काहीसा वेगळा जॅानर घेऊन आले आहेत. 'आय एम सॅारी' मध्ये काय पहायला मिळणार याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळत असल्यानं या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचं कथानक आपल्या दैनंदिन जीवनाशी मिळतंजुळतं असल्यानं प्रत्येक प्रेक्षकाला ते आपलंसं वाटेल असं मत दिग्दर्शक दीपक भागवत यांनी व्यक्त केलं आहे.
एका नव्या कोऱ्या जोडीच्या माध्यमातून 'आय एम सॅारी'ची स्टोरी प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, या चित्रपटासाठी कलाकारांइतकीच प्रत्येक विभागातील घटकानं मेहनत घेत आपलं १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केल्याचंही भागवत म्हणाले. मराठी चित्रपटांसोबतच सन टीव्हीवरील ‘जाऊ नको दूर बाबा’ तसेच 'तेरी लाडली मैं' या हिंदी मालिकेत झळकलेली मयूरी कापडणे यात मुख्य भूमिकेत दिसणार असून तिच्या जोडीला रियाज मुलाणी आहे. रियाज सध्या झी मराठीवरील ‘मन झालं बजिंद’ मालिकेत काम करत आहे. याखेरीज अनुराग शर्मा, नेहा तिवारी, राजन ताम्हाणे, समीरा गुजर, कौस्तुभ पाध्ये, श्रीकांत कामत, राजेश लाटकर, भगरे गुरुजी, अस्मिता खटखटे, स्वाती पानसरे, सुषमा सीनलकर, बाल कलाकार, ओमकार जाधव, सानवी चव्हाण आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.