मुंबई- सध्या शिवकालीन चित्रपटांना खूप मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक अज्ञात गोष्टी अनेक लेखक दिग्दर्शक आणि अर्थातच निर्माते प्रेक्षकांसाठी आणताना दिसताहेत. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीराच्या गाथेला उजाळा देण्यास जैन फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, निर्माते गौतम मुथा निर्मित आणि दिग्दर्शक दिपक कदम दिग्दर्शित ( Directed by Deepak Kadam ) , 'सरनोबत' अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात ( Historical film Sarnobat ) , हा भव्यदिव्य चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर ( Motion poster of Sarnobat ) प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
दिग्दर्शक दिपक कदम यांनी सरनोबत चित्रपटातून वेडात मराठे वीर दौडले सात, असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते त्या शूर सेनान्यांचा म्हणजेच प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे यांचा पराक्रम हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी दिपक कदम यांनी 'पुरषा', 'ऍट्रोसिटी', 'एका लग्नाची गोष्ट', 'नगरसेवक एक नायक', 'वाक्या', 'गोल माल प्रेमाचा', 'संसाराची माया' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी अनेक मालिकांचेही दिग्दर्शन केले असून 'पुरषा' हा वेगळ्या धाटणीचा अवॉर्ड विनिग चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
ते म्हणाले, “महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याची मौल्यवान देणगी लाभली आहे. डोंगर माथ्यांनी नटलेल्या भूमीत अनेक संत, महात्मे, शूर-वीर होऊन गेले. महाराष्ट्राला ख-या अर्थाने महान राष्ट्र बनविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. महाराजांशी निष्ठा व स्वराज्य रक्षणाची तळमळ प्रत्येक मावळ्याच्या नसा-नसात भिनली होती. शेकडो वीरांच्या शौर्याची साक्ष मातीचा कण आणि कण देत आहे.”