मुंबई - सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन करीत समाजाला एक दिशा दर्शविली. तसेच स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले आणि त्यात त्यांना भक्कम साथ दिली त्यांची पत्नी सावित्रीदेवी फुले यांनी. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित एक मराठी सिनेमा येऊ घातला आहे ज्याचे नाव आहे, 'सत्यशोधक'. 'सत्यशोधक' मधून तत्कालीन व्यवस्थेचे आणि स्त्रियांवरील अत्याचाराचे दाहक सत्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे तसेच सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष मांडला आहे.
सत्यशोधक चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च - महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीऩ खात्यांचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बहुप्रतिक्षित सत्यशोधक या चित्रपटाचे मोशन पोस्टरचे एका छोटेखानी समारंभात अनावरीत केले. हा समारंभ पार पडला मुंबईतील शासकीय अतिथीगृह सह्याद्री येथे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सुधीर मुनगंटीवार यांनी येथे हजेरी लावली आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ११ एप्रिल रोजी असलेल्या महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत समता फिल्म्स. तसेच निर्मितीची धुरा वाहिली आहे प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ यांनी. निलेश जळमकर यांनी सत्यशोधक चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मोशन पोस्टर अनावरण प्रसंगी हे सर्व उपस्थित होते आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांनी नेहमीच दिलेल्या प्रोत्साहनासाठी आभार मानले.
Motion Poster of Satyashodhak : महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च - महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील जीवनपट 'सत्यशोधक' या चित्रपटाचे मोशन पोस्टर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. महात्मा फुलेंचा विचार आजच्या काळातील तरुणांच्यापर्यंत पोहोचावा व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीस चालना देण्यासाठी हा जीवनपट समता फिल्म्सने बनवला आहे. अष्टपैलु अभिनेता संदिप कुलकर्णी यामध्ये महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहेत.
सत्यशोधक चित्रपट समाजाला दिशा देणारा - याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'महात्मा जोतिबा फुले यांचे जीवन समाजाची उन्नती करण्यात गेले. त्याच्या विचारांवर आधारित जीवनपट 'सत्यशोधक' या चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरण करताना मला अभिमान वाटतोय. हा चित्रपट सामाजिक दिशादर्शक ठरू शकतो कारण आजच्या काळात समाजात विखुरलेपण जाणवते. अशा काळात सत्यशोधक हा चित्रपट समाजाला दिशा देणारा असेल. जोतिबा फुले यांचा "सब समाज को साथ लिए हम, हम को है आगे बढना" हा विचार सामाजिक एकतेविषयी बोलणारा असून त्या क्रांतिसूर्याला अभिप्रेत असणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे. त्याच्या खांद्याला खांदा लाऊन समाजकार्य करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी भिडे वाडा येथे महिलांसाठी शाळा सुरू केली होती. हे सर्व सत्यशोधक मधून प्रेक्षकांना बघायला मिळेल. हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणास्थान असेल हे नक्की. या चित्रपटातून समाज प्रबोधन करणाऱ्या निर्माते, कलाकार आणि लेखक-दिग्दर्शक यांचे मी अभिनंदन करतो.'
महात्मा फुलेंच्या भूमिकेत संदिप कुलकर्णी- सत्यशोधक मध्ये महात्मा फुले यांची भूमिका टॅलेंटेड अभिनेता संदीप कुलकर्णी साकारत आहे. त्यांना उत्तम साथ दिली आहे राजश्री देशपांडे, रवींद्र मंकणी, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, अनिकेत केळकर, अनिरुद्ध बनकर, राहुल तायडे, मोनिका, जयश्री गायकवाड, डॉ. खेडेकर, डॉ. सुनील गजरे या कलाकारांनी. समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित व दिग्दर्शित "सत्यशोधक" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -Kushal Badrike As Villain : रावरंभा चित्रपटात क्रूर कुरबतखानची भूमिका साकारणार विनोदवीर कुशल बद्रिके