मुंबई - Morya movie : कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'मोऱ्या' चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. 'मोऱ्या'ला लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'च्या आयकॉनिक चित्रपटगृहामध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान देखील मिळाला आहे. यानंतर अनेकजण या चित्रपटाची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत. दरम्यान हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता 'मोऱ्या' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डवर काही गंभीर आरोप केले आहेत. सेन्सॉर बोर्ड आणि त्यांचे प्रशासन जाणीवपूर्वक चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब करत असल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.
सेन्सॉर बोर्डावर 'मोऱ्या' चित्रपटाच्या निर्मात्यांचा आरोप :दोन कोटीच्या बजेटमध्ये बनलेला'मोऱ्या' हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू,आणि कन्नड भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. 'मोऱ्या'नं सप्टेंबर 2022 मध्ये सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या चित्रपटाची स्क्रिनिंग ऑक्टोबरमध्ये झाली. 'मोऱ्या' चित्रपटाच्या ग्राफिक्स बदलण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला होता. या कामासाठी काही लाख रुपये खर्च येणार होता. त्यामुळे तातडीने आवश्यक बदल करणं शक्य झालं नाही. त्यानंतर जेव्हा लाखो रुपये खर्चून आवश्यक बदल करण्यात आले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली होती. नवीन अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया पुन्हा करण्याचा सल्ला दिला. आता हा चित्रपट आर्थिक अडचणीतही सापडला आहे. सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास दुर्लक्ष करत आहे, अशी कैफियत चित्रपटाच्या निर्मात्यांनी मांडली आहे. दरम्यान, ईटीव्हीनं जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काहीही संपर्क होऊ शकला नाही. 'मोऱ्या'च्या निर्मितीसाठी जितेंन्द्र बर्डे यांना तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची साथ लाभली आहे. सफाई कामगाराच्या जीवनाला कलाटणी मिळून तो सरपंच होतो अशी कथा असलेला हा वेगळ्या विषयावरील चित्रपट आहे. यातील विषयाला न्याय देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील गावात याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. सेन्सॉरच्या कात्रीतून चित्रपट कसा सोडवायचा याचा विचार आता निर्माते आणि चित्रपटाच्या टीमला पडला आहे. याप्रकरणात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.