मुंबई - हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता मोहन जोशी यांचा आज ७१ वा वाढदिवस. गेली चार दशके रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट व्यवसायात त्यांनी आपल्या अत्तुंग अभिनयाच्या जोरावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टील महान व्हिलन असी प्रतिमा त्यांची तयार झाली होती. साधी राहणी, सतत कामाचा विचार, अभिनयावर मनापासून प्रेम आणि सहकालाकारांसोबत जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे मोहन जोशी आजही मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून रंगभूमीवरील कलावंत व बॅकस्टेजवरील कलाकार यांची सेवा करत आहेत.
मोहन जोशी यांचा जन्म १२ जुलै १९५३ रोजी बंगलोर येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात होते. १९५७ पर्यंत बंगलोरमध्ये राहून ते पुन्हा पिण्यात परतले. टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. याच काळत त्यांच्यातील खट्याळपणा आणि नकला करण्याच्या सवयीमुळे त्यांचा आढा अभिनयाकडे आहे हे वडीलांनी जाणले. त्यानंतर भरत नाट्य मंदिरात त्यांनी प्रवेश घेतला आणि बालनाट्यातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले. टुनटुन नगरी, खणखण राजा हे ते बालनाट्य होते. त्यानंतर आंतरशालेय एकांकिका, करत करत मोरुची मावशी हे नाटक मिळाले. पुण्यात असताना नाथ हा माझा, रायगडला जेव्हा जाग येते, कुर्यात सदा टिंगलम, गुड बाय डॉक्टर ही नाटकं केली. पुढे मुंबई घरोघरी हीच बोंब हे त्यांने व्यावसायिक नाटक केले. शरद तळवलकर यांच्यासह या नाटकाचे ३०० प्रयोग त्यांनी केले.
विशेष म्हणजे याच काळात ते ट्रान्सपोर्टचा व्यवसायही करत. यासाठी त्यांनी एक टेम्पो घेतला होता. नाटकाचे साहित्य वाहून नेण्यासाठी ते स्वतः या टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून काम करायचे. महाराष्ट्रभर नाटकांचे दौरे करताना त्यांनी याच टेम्पोतून साहित्य वाहिले. नाटकाचे साहित्य पोहोचवल्यानंतर रात्री नाटकात काम करायचे आणि नाटक संपल्यावर पुन्हा टेम्पो भरुन दुसऱ्या प्रयोगासाठी रात्रभर प्रवास ते करायचे.
नाटकाच्या या प्रवासादरम्यान त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एक डाव भुताचा हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट त्यांचा मित्र बनवत होते. यात त्यांना मुख्य व्हिलनची भूमिका देण्यात आली. या चित्रपटात अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर आणि रंजना यांच्या भूमिका होत्या. रंजना या त्याकाळातील खूप लोकप्रिय अभिनेत्री होत्या. व्हिलन म्हणून त्यांना या सिनेमात रंजना यांची छेडछाड करायची होती. पण रंजना यांनी अनोळख्या व्यक्तीकडून अंगाला स्पर्श करुन घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने त्यांना हा रोल मिळाला नाही. या सिनेमात एक सटर फटर भूमिका देण्यात आली. पण कोणताही अपमान वाटून न घेता त्यांनी ही भूमिका स्वीकारली.