मुंबई- Mohammad Rafi Award 2023 : स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव तर मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी गीतकार संतोष आनंद आणि गायक सोनू निगम यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे. कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी नावाजलेले दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारे गीतकार संतोष आनंद यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि उमदा गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा 99 वा वाढदिवस असून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे, या निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व असल्याचे ते म्हणाले.
काय आहे पुरस्काराचे स्वरूप?
रफी पुरस्काराचे यंदा 17 वे वर्ष असून एक लाख रूपये धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ५१ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबीय आमदार शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली. वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वाजता पार पडणार आहे.