मुंबई:औरंगजेब सारख्या स्वराज्यावर टपून बसलेला बलाढ्य मोगल दिल्लीपती बादशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा झोपवणाऱ्या मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटाची सध्या चर्चा आहे. प्लैनेट मराठी आणि मंत्रा व्हीजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दीग्दर्शन राहुल जाधव यांनी केले आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद डाॅ.सुधीर निकम यांचे तर संगीत अवधुत गुप्ते यांचे आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, अजीत सिध्धये, प्रा. यशवंत देशमुख, संजय कुलकर्णी, राजेंद्र सिसदकर आदी कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत.
छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच याव्यतिरिक्त एक आदर्श सून, पत्नी आणि माता अशा विविधांगी जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्याचे पहायला मिळते. या रणरागिणीची शौर्यगाथा चित्रपटात मांडण्यात येत आहे.