मुंबई - बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक झाला आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता पुन्हा एकदा चक्रवर्ती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यावेळी मिथुनने आपली आई गमावली आहे. मिथुनच्या आई शांतीराणी चक्रवर्ती यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी मिथुनचा मुलगा नमोशी चक्रवर्ती यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी काही वर्षापूर्वी आपल्या आईंना मुंबईतील घरात आणले होते. यापूर्वी त्या कोलकाता येथील जोराबागन येथे राहात होत्या. याच घरात मिथुन घरात आई-वडील आणि चार भाऊ बहिणींसोबत राहत होता. मिथुनने फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठीचा सर्व संघर्ष याच घरातून केला होता. पुढच्या काळात मिथुनला नाव, लौकिक आणि प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्या वाट्याचे हाल थांबले. त्यानंतर त्याने आई वडिलांसह मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला होता.
मिथुनवर कोसळलेल्या या दुखःद घटनेची आता त्याच्या चाहत्यांना माहिती मिळू ळागली आहे. फिल्म आणि इतर उद्योगात ही बातमी कळल्यानंतर मिथुनची आई आई शांतिराणी चक्रवर्ती यांनी श्रद्धांजली वाहिली जात आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी मिथुनच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांनी ट्विट करुन लिहिलंय की, 'मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या आईच्या निधनाबद्दल मनापासून शोक. मिथुनदा आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळाले ही प्रार्थना. ' खरंतर कुणाल घोष यांनी मिथुनवर अनेकदा टीका केली होती. राजकीय मतभेदातून ही टीका केली जात होती. मात्र मिथुनदाला मातृशोक झाल्यानंतर त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमुल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले होते. मात्र सत्ता संपादन करणे शक्य झाले नव्हते. सध्या मिथुन चक्रवर्ती 'डान्स बांगला डान्स'मध्ये दिसत आहेत. या रिअॅलिटी शोद्वारे ते बऱ्याच वर्षांनी बंगाली टेलिव्हिजनवर परतले आहेत. काही दिवसांपूर्वी 'डीबीडी'च्या सेटवर वडिलांच्या निधनाची आठवण सांगताना खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. या गोष्टीला पार काळ झाला नाही तोवर त्यांना आईच्या निधनाचे दुःख सहन करावे लागत आहे.