मुंबई - Mission Raniganj : अभिनेता पवन मल्होत्रा आगामी 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटातून एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यानं या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव कथन केला. एएनआयशी बोलताना पवनने त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'शूटिंगच्या आधी या खाण कामगाराबद्दल काहीच माहिती नव्हती. गिल साब हे इंजिनियर होते आणि त्यांना कॅप्सूल गिल म्हटलं जायचं, त्यांनी आपला जीव धोक्यात घालून खाण कामगारांचं रेस्क्यू केलं आणि 57 जणांना वाचवलं. गोष्ट अशी होती की ते खाणीमध्ये आत गेले आणि खाण कामगरांना वाचवू बाहेर पडणारे ते शेवटचे व्यक्ती होते. ही कथा इंजिनियर्सची आहे आणि या चित्रपटात मी एका कॅप्सूल मॅनची भूमिका साकारत आहे. खणण्यासाठी छिद्र पाडून त्यामध्ये कॅप्सूल घालणाऱ्याला कॅप्सूल मॅन म्हटलं जातं. अशा प्रकारे खाणीत दबल्या गेलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. या अनोख्या कथेसाठी निर्माता आणि दिग्दर्शकांनी पाठींबा दिला याचा मला आनंद आहे. दिग्दर्शनाकडे ही स्क्रिप्ट बराच काळापासून पडून होती. अक्षयने होय म्हटलं आणि निर्मात्यानेही हा प्रकल्प कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केलं.'
या चित्रपटात भोला या खाण कामगाराची भूमिका साकारणारा अभिनेता रवी किशन याने आपला अनुभव सांगितला. रवि म्हणाला, 'एक खाण कामगार मृत्यूकडे जवळून कसे पाहतो हे मी शूटिंग दरम्यान अनुभवलं. ही कथा 1989 मध्ये खाणीमध्ये अडकले होते त्या खाण कामगारांची आहे. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वाटत होतं की ते वाचणार नाहीत. यात मी भोला या खाण कामगाराची भूमिका करत आहे. माझ्या कारकिर्दीत अशी भूमिका कधीच केली नाही.' अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' हा चित्रपट 6 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
टिनू सुरेश देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय आणि वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. यापूर्वी दिग्दर्शक टिनू सुरेश देसाई यांच्यासोबत अक्षय कुमारनं क्राईम थ्रिलर 'रुस्तम' चित्रपटासाठी काम केले होते. या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.