मुंबई - Mission Raniganj for Oscar nomination : अक्षय कुमारचा अलिकडंच प्रदर्शित झालेला 'मिशन राणीगंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करत नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरला आहे. अनेक समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलंय. इतकंच नाही तर दस्तुरखुद्द अक्षय कुमारनंही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट असल्याचं म्हटलंय. दरम्यान, 'मिशन राणीगंज' संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वतंत्रपणे 'मिशन राणीगंज' ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या निर्मात्यांनी 'मिशन राणीगंज' चित्रपट 10 मार्च 2024 रोजी होणाऱ्या 96 व्या अकादमी पुरस्कारांसाठी स्वतंत्रपणे पाठवला आहे. नेमकं अशाच प्रकारे 'आरआरआर' चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलं होतं. 'आरआरआर' चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पुरस्कार श्रेणीसाठी पात्र ठरला नव्हता, मात्र यातील 'नाटू नाटू' या गाण्याला पुरस्कार मिळाला होता. 'आरआरआर' प्रमाणे मिशन राणीगंज चित्रपटही सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट पुरस्कार श्रेणीसाठी पात्र ठरणार नाही. 'मिशन राणीगंज'ला ऑस्करमध्ये कोणत्या श्रेणीत नामांकन मिळणार आहे, येणाऱ्या काळातच समजेल.
चित्रपटाबद्दल सांगायचं तर 'मिशन राणीगंज' चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीत 71 मजूर अडकले होते. त्याचवेळी या खाणीशी संबंधित अभियंता जसवंत सिंग गिल यांनी आपला जीव धोक्यात घालून या 71 मजुरांचे प्राण वाचवले होते. अक्षय कुमारनं चित्रपटात रियल हिरो जसवंत सिंगची भूमिका साकारली आहे.
'मिशन राणीगंज' चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'थँक्स फॉर कमिंग' चित्रपटाशी त्याची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. आज, 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची ऑफर देण्यात आली आहे.