मुंबई - Mera Piya Ghar Aaya : 'मेरा पिया घर आया' हे गाणं तुम्हाला आठवत असंल. 25 वर्षेपूर्वी या गाण्याच्या ट्रॅकनं कहर निर्माण केला होता. मिरवणूका, लग्नाच्या वराती, सण उत्सव ते सर्वत्र या गाण्याचंच सूर ऐकू यायचं. 'याराना' चित्रपटात माधुरी दीक्षितवर चित्रीत झालेल्या या आयकॉनिक गाण्याला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. आजही हे गाणं तितकंच ताजं आहे. माधुरीच्या या लोकप्रिय गाण्याच्या ट्रॅकचा आता रिमेक झालाय. गुरुवारी अभिनेत्री सनी लिओनीने 'मेरा पिया घर आया 2.0' या तिच्या नवीन गाण्याचा टीझर शेअर केला. हा टीझर शेअर करताना इन्स्टाग्रामवर सनी लिओनीने टीझरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'हे गाणं जगासोबत शेअर करताना मला खूप अभिमान वाटतो. माधुरी दीक्षित नेणे यांच्या गाण्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात रिमेक करणे खूप सन्मानाची गोष्ट आहे. 'मेरा पिया घर आया 2.0 ' गाण्याचा टीझर आता लॉन्च झाला आहे.'
'मेरा पिया घर आया 2.0' हे नवं रिमेक गाणं नीती मोहननं गायलंय आणि या गाण्याचं बोल एनबी आणि माया गोविंद यांनी लिहिलेत. 8 ऑक्टोबरला हे गाणं प्रदर्शित केलं जाणार आहे. सनी लिओनीने गाण्याची झलक दाखवणारा टीझर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी लाल हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शन भरुन टाकला. या गाण्याची फार काळ प्रतीक्षा करु शकत नाही, असं एका युजरनं म्हटलंय. तर आणखी 'एकानं सुंदर नृत्य सुंदर हास्य' असंही लिहिलंय. सनी लिओनी हीच बॉलिवूडची क्वीन असल्याचं, एका युजरनं कौतुकानं म्हटलंय.
सनी लिओनीच्या नावावर अनेक आयकॉनिक म्यूझिक ट्रॅक लोकप्रिय ठरलेत. यापूर्वी सनी 'लैला मैं लैला' सारख्या आयकॉनिक ट्रॅकच्या रिमेकमध्येही दिसली होती. चित्रपट आघाडीचा विचार करता सनीनं आजवर 'जिस्म 2', 'जॅकपॉट', 'शूटआउट ॲट वडाला', 'रागिनी एमएमएस 2' यासह अनेक चित्रपटातून लक्षवेधी भूमिका केल्या आहेत.
अलीकडेच सनी लिओनी हिनं अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. या चित्रपटात राहुल भट आणि अभिलाष थापलियाल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसाभोवतीच्या कथेत फिरतो. या व्यक्तीला मृत समजले जाते, परंतु तरीही तो भ्रष्ट व्यवस्थेसाठी कार्यरत आहे, आणि मुक्ती शोधत आहे. अशा वेगळ्या विषयावरील चित्रपटात सनी लिओनीची महत्त्वपूर्ण भूमिका संस्मरणीय ठरली होती.