मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील महान कलावंत निळू फुले यांचा आज १२ वा स्मृतिदिन. १३ जुलै २००९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व पोरके झाले. आज निळू भाऊ जगात नसले तरी त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका, त्यांचे किस्से, नाटक आणि चित्रपटांच्या चित्रफिती यातून ते आपल्याला भेटत असतात. त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांना आदरांजली वाहून आठवणी जागवूयात.
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणार्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्या अर्थाने पुढे आले.
समजावादी विचारवंत - निळू फुले मूळचे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकातून ते रंगभूमीपर्यंत पोहोचले आणि कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग 40 वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून काम केले आहे.