मुंबई - Meghna Gulzar on Deepika Padukone :'राझी' आणि 'तलवार' यांसारख्या चित्रपटांनी नाव कमावलेली दिग्दर्शिका मेघना गुलजार या तिच्या आगामी चित्रपट 'सॅम बहादूर'मुळं चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'सॅम बहादूर' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. आता या चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये मेघनाला तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या अपयशाबद्दल विचारण्यात आलं होतं. दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीमुळं चित्रपटावर परिणाम झाला का असा सवाल तिला विचारण्यात आला होता. 'छपाक'च्या अपयशाबद्दल खुलासा करत तिनं म्हटलं की, ''मला खात्री आहे की याचं उत्तर अगदी स्पष्ट होय असंच आहे. नक्कीच, त्याचा चित्रपटावर परिणाम झाला, हे नाकारता येणार नाही."
'छपाक' चित्रपटादरम्यान दीपिकानं दिली जेएनयूला भेट : जानेवारी 2020 मध्ये दीपिका पदुकोणची जेएनयू भेट खूप वादग्रस्त ठरली होती. 'छपाक' या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान ती जेएनयू कॅम्पसमधील महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर रस्त्यावर आणि सोशल मीडियावर 'छपाक' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. हा चित्रपट यावेळी प्रदर्शित होणार होता. आता या चित्रपटाची दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी याबाबत चर्चा केली आहे. 2020 च्या सुरुवातीस, जेएनयूमध्ये एक खळबळ उडाली होती. मुखवटा घातलेल्या बदमाशांनं कॅम्पसमध्ये घुसखोरी करून वसतिगृहात विद्यार्थ्यांवर लाठ्या आणि रॉडने हल्ला केला होता. त्यानंतर या महाविद्यालामधील वातावरण पेटले होते. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर कॅम्पसमध्ये 'देशविरोधी घोषणा' दिल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. या वादाला मोठं वळण मिळालं होतं. जेएनयूमध्ये जाण्यापूर्वी दीपिका पदुकोण एका मुलाखतीत जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलली होती.