मुंबई- 'जवान' या चित्रपटाच्या यशानंतर सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाच्या रिलीजची जय्यत तयारी करत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी यांच्यासह अनेक मोठे कलाकार दिसणार आहेत. काही दिवसापूर्वी निर्मात्यांनी 'डंकी' चित्रपटाची पहिली झलक दाखवणारा टीझर रिलीज केला होता. आता शाहरुखनं प्रेक्षकांना डिवचण्यासाठी सोशल मीडियावर 'बहोत कुछ शेयर करना बाकी है', असं लिहित चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले.
शाहरुख खान आणि टीम 'डंकी'नं या चित्रपटाची दोन नवीन पोस्टर प्रसिद्ध करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केलाय. 'डंकी'च्या पहिल्या पोस्टरमध्ये शाहरुख खानचा एक डॅशिंग लूक पाहायला मिळतोय. विकी कौशल आणि तापसी पन्नू देखील पोस्टरमध्ये आकर्षक दिसताहेत. दुसऱ्या पोस्टरमध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नू इतरांसह वाळवंटातून चालताना दिसताहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दल अत्सुकता वाढली आहे. याला शाहरुखनं दिलेली कॅप्शनंही फार मजेशीर आहे. त्यानं लिहिलंय, 'हम बिल्कुल उसी तराह दिख रहे है जैसे राजु सर ने अपने उल्लु के पठ्ठों को इमॅजीन किया था. इनके बारे में बहोत कुछ शेअर करना अभी बाकी है.'पैसे कमवण्याच्या हेतूनं लोक देशाटन करण्याचा विचार करतात. पण दुसऱ्या देशात अवैध पद्धतीनं घुसखोरी करुन राहण्याचा मार्ग काही लोक नाईलाजानं स्वीकारतात. अशाच पाच मित्रांची ही कथा आहे. यासाठी दिग्दर्शक हिराणी यांनी पाच अतरंगी कलाकारांचं कास्टिंग यासाठी केलीय. यामध्ये शाहरुख, तापसी, विकी कौशल यांचाही समावेश आहे. हे कलाकार पडद्यावर कसे दिसतील याचा जो विचार त्यांनी केला होता त्याबरहुकुम हे वल्ली दिसत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय.
'डंकी' हा शाहरुख खानच्या रेड चिलीज या होम प्रॉडक्शनचा चित्रपट आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर प्रभासची भूमिका असलेल्या 'सालार - भाग 1 सीझफायर' या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. केजीएफ फेम प्रशांत नील दिग्दर्शित प्रभासची भूमिका असलेला हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.