मुंबई - Lagnakallol Motion Poster Launched : मराठी चित्रपटामध्ये विनोेदी चित्रपटांना वेगळं स्थान आहे. दर्जेदार आणि मार्मिक विनोदाची चुरचुरीत फोडमी देऊन आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. याच मालिकेमध्ये लग्नात उडणारा सावळा गोंधळ हा विषय घेऊन एक वेगळी कलाकृती बनवण्याचा प्रयत्न होतोय. लग्न म्हटले की गडबड, धावपळ होतंच असते. त्यातही मानपान आणि त्यातून उत्पन्न झालेले रुसवेफुगवे सर्वांनाच परिचित आहेत. जर का ते हाताबाहेर गेले तर विस्फोट अथवा कल्लोळ होण्याची शक्यता असते. अशाच आशयाचा एक चित्रपट येऊ घातला आहे ज्याचे नाव आहे 'लग्नकल्लोळ'. चित्रपटाच्या नावावरून आणि मोशन पोस्टरवरून कल्पना येते की हा सिनेमा लग्न आणि त्यात उडालेल्या कल्लोळाविषयी असणार.
याच्या कलरफुल पोस्टरवरून ध्यानात येते की यातील विषयाची मांडणी विनोदी अंगाने जाणारी असणार. मात्र यात नक्की 'कल्लोळ' काय आहे हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. सिनेमाच्या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव लग्नाच्या पेहरावात दिसत आहेत. तिघांच्याही हातात हार असून आता ही वरमाला कोणाच्या गळ्यात पडणार हे गौडबंगाल १ मार्चला उलगडेल.