मुंबई- दोनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झिम्मानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती आणि म्हणूनच 'झिम्मा २' दुप्पट भुरळ घालायला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिक्वेलचं टीझर प्रकाशित झालं होतं आणि ते पाहून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली होती. आता त्यांना भुरळ घालायला 'झिम्मा २' च्या निर्मात्यांनी चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित केलंय. 'मराठी पोरी' असे बोल असलेल्या या नव्या रूपातलं नवं बाईपण जपणाऱ्या गाण्यातून सर्व स्तरीय स्त्रियांचे प्रतिनिधित्व केलेलं दिसंल.
झिम्माच्या पहिल्या भागाचं संगीत लोकप्रिय झालं होतं त्यामुळे दुसऱ्या भागाच्या संगीताबद्दल उत्सुकता असणे साहजिक आहे. 'झिम्मा २' मधील ‘मराठी पोरी' या गाण्याचे बोल लिहिले आहेत क्षितिज पटवर्धन यांनी आणि संगीत दिलंय अमितराज यांनी. या उडत्या चालीच्या गाण्याचं पार्श्वगायन केलय आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी. हे एक सिच्युएशनल सॉंग असून इंदूच्या ७५व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन होताना चित्रित करण्यात आलंय. या गाण्यावर चित्रपटातील मराठी पोरी आपापला स्वॅग दर्शवत थिरकताना दिसणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी सर्व स्त्रियांचे स्वभाव वैशिष्ठ अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
या गाण्याबद्दल संगीतकार अमितराज म्हणाले की, 'हे सेलिब्रेशनचं गाणं आहे. त्यामुळे गाण्याचा मूड त्याच पद्धतीचा हवा होता. क्षितिजच्या गाण्याचे बोलही इतके सुंदर आहेत की चाल आपसूक सुचत गेली. त्यातच चित्रपटातील कलाकार भन्नाट आहेत आणि त्यांच्या गाण्यातील वावरानं हे गाणे जास्तच गोड वाटतंय. या सात जणी जणू इंद्रधनुष्याचे सात रंगच आहेत. रंग वेगवेगळे असले तरी एकत्र आल्यावर कमाल होते.'