मुंबई- मराठी चित्रपटांनी अनेकदा अटके पार झेंडे रोवले आहेत. याच परंपरेला पुढे घेऊन जात असंख्य चित्रपट महोत्सवात गाजलेला मराठी चित्रपट रुप नगर के चीते आता मेलबोर्नला निघाला आहे. इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबोर्न २०२३ साठी 'रूप नगर के चीते'ची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट महोत्सव ११ ते २० ऑगस्ट २०२३ ला पार पडणार आहे.
अनेक चित्रपट मोहत्सवात बाजी - जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपट सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मराठी चित्रपट आशय, विषय, मांडणीमध्ये आपला दर्जा कायम राखून आहे. दोन मित्रांमधील जीवाभावाची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरच्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाला यापूर्वी 'जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' उत्कृष्ट कथानकासाठी 'आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड' मिळाला होता. यानंतर 'टागोर आंतरराष्ट्र्रीय चित्रपट महोत्सव' 'इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आणि 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात'ही या चित्रपटाने आपला ठसा उमटवला होता.
रूप नगर के चीतेमध्ये नवोदितांची मांदियाळी - 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून निरागस मैत्रीचा विषय मनोरंजकपणे हाताळला आहे. यात करण परब, कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने आणि रजित कपूर या कलावंताच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट देश विदेशातील चित्रपट महोत्सव गाजवत आहे. याशिवाय यंदाच्या 'लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स २०२३' मध्ये चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे. हा डिजीटल चित्रपट मोहत्सव जागतिक ऑनलाइन चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. 'रूप नगर के चीते' या चित्रपटावर अनेक चित्रपट महोत्सवातून होणारा पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला आनंद देणारा असल्याची भावना दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आणि निर्माते मनन शाह यांनी व्यक्त यापूर्वी केल्या आहेत. फिल्म फेस्टीव्हलमध्ये भाग घेतलेल्या अनेक चित्रपटांमधून 'रूप नगर के चीते'ला हे मानाचे पुरस्कार मिळाले असून जगभरातून आलेल्या अनेक चित्रपटांच्या लिस्टमधून 'रूप नगर के चीते'ची झालेली निवड अभिमानास्पद आहे.
हेही वाचा -Rgv Receives B Tech Degree : दिग्दर्शक राम गोपाल वर्माने तब्बल ३७ वर्षानंतर घेतली बी टेकची पदवी