मुंबई - चांगल्या विनोदी मराठी चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच पाठिंबा देत असतात. हास्याचे विविध रंग लेऊन एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय तो म्हणजे ‘झोलझाल’. विनोदी बाजाच्या 'झोलझाल' चित्रपटातल्या गाण्यांबद्दल जी उत्सुकता होती, त्याला म्युझिक लाँच वेळी पूर्णविराम मिळाला. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा आणि टिझर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. मल्टीस्टारर अशा या चित्रपटात हास्याचे विविध रंग विविध कलाकारांच्या अभिनयातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहेत. चित्रपटातील धडाकेबाज गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणार हे गाण्यांच्या जातकुळीवरून सिद्ध होतंय. ''झोलझाल' हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चित्रपटाचा कणा म्हणून चित्रपटाच्या संगीताकडे पाहिलं जातंय. झोलझाल चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल्ल - स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटातील गाण्याचे बोल मंदार चोळकर, बाबा चव्हाण, वरून लिखाते यांनी शब्दबद्ध केले आहेत. सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायकांनी चित्रपटातील गाण्यांना चारचांद लावले आहेत. गायक अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, कविता राम, प्रवीण कुवर, जय अत्रे, जुईली जोगळेकर, प्रतिभा सिंग बाघेल या गायकांनी त्याच्या स्वमधुर आणि दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.