मुंबई- माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये रेड कार्पेटवर पदार्पण करण्यासाठी तयार झाली आहे. फ्रान्समध्ये 16 मे ते 27 मे दरम्यान 76 वी आवृत्ती पार पडेल. या प्रतिष्ठित सोहळ्यात ती बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत सहभागी होणार आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हलचे पोस्टर - 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री कॅथरीन डेन्यूव्ह दाखवण्यात आलीय. तिचे पोस्टर लिओनेल एविग्नॉन आणि स्टीफन डी व्हिव्हिज यांनी तयार केलंय. चित्रपटातील योगदानाबद्दल कॅथरीन डेन्यूव्ह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोस्टरची निवड करण्यात आली आहे. मायवेन दिग्दर्शित जीन डू बॅरीसह महोत्सवाची सुरुवात होईल. पीटर सोहन दिग्दर्शित पिक्सारच्या एलिमेंटल चित्रपटाने हा महोत्सवाची सांगता होईल.
दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रींचा सहभाग - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, विद्या बालन, शर्मिला टागोर आणि दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक बॉलिवूड व्यक्तिमत्त्वांनी फ्रेंच फेस्टिव्हलसाठी ज्युरींची भूमिका पार पाडली आहे. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रासह सोनम कपूर, मल्लिका शेरावत, पूजा हेगडे, हिना खान, तमन्ना भाटिया आणि अदिती राव हैदरी यांनीही रेड कार्पेटवर चाल केली आहे.