मुंबई- दगडी चाळ हा मुंबईतील भायखळा येथील एक भाग आहे. तिथे जवळपासच्या कारखाण्यातील कामगार राहायचे. आता ते अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे. ऑक्टोबर २०१५ ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्रपट प्रकाशीत झाला, ज्यामध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे व पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने कमाल केली होती. तब्बल ३७ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला होता.
अरुण गवळी या वादग्रस्त व्यक्तिमत्वावर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट बनला होता आणि बराच चाललाही होता. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याचा आता सिक्वेल येऊ घातलाय.
दगडी चाळ २ चित्रपटातील अरुण गवळीच्या भूमिकेतील मकरंद देशपांडेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात पुन्हा एकदा डॅडी चुकीला माफी नाही असे म्हणताना दिसणार आहे. यातील डॅडीचा करारी लूक पोस्टरवर दिसत आहे.