मुंबई - Mahima Chaudhary Birthday : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी 13 सप्टेंबरला तिचा 50वा वाढदिवस साजरा करतेय. महिमा चौधरीचा जन्म पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये झाला. महिमाचं दहावीपर्यंतचं शिक्षण डाऊ हिल, कुर्सिओंग येथे झालं. त्यानंतर तिनं आपलं पूर्ण कॉलेज शिक्षण दार्जिलिंगच्या लोरेटोमध्ये केलं. महिमानं बॉलिवूडमध्ये दणदणीत पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून तिनं चाहत्यांची मनं जिंकली. मात्र तिला हिंदी चित्रपटसृष्टीत फार काळ टिकता आलं नाही. तिचा पहिला 'परदेस' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तिनं आपलं रितू हे मूळ नाव बदलून महिमा चौधरी असं ठेवलं. 'परदेस' चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांच्या सूचनेवरून तिनं आपलं नाव बदललं. सुभाष घई हे त्यांच्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी 'एम' हे अक्षर लकी मानायचे. मिनाक्षी शेषाद्री, माधुरी दीक्षित, मनिषा कोईराला या अभिनेत्रींना चित्रपटात प्रमुख भूमिकेत घेऊन त्यांनी तयार केलेले चित्रपट खूप गाजले. रितू चौधरीचं महिमा चौधरी करण्यासाठी हे कारण पुरेसं होतं.
महिमाचं चित्रपटसृष्टीत पदार्पण :महिमा चौधरीनं 1990मध्ये आपलं शिक्षण सोडून मॉडेलिंगच्या जगात करिअर सुरु केलं. ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. महिमाला हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक सुभाष घई यांनी आणलं. सुभाष घईनी 'परदेस' चित्रपटातील 'गंगा'च्या भूमिकेसाठी महिमाची निवड केली. या चित्रपटात ती अपूर्व अग्निहोत्री आणि शाहरुख खानबरोबर दिसली होती. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी तिला 'फिल्मफेअर'चा सर्वोत्कृष्ट पदार्पण कलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. महिमाच्या सौंदर्यामुळे पहिल्याच चित्रपटात तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी झाली.'परदेस' नंतर 'दाग द फायर', 'प्यार कोई खेल नहीं', 'धडकन', 'खिलाडी 420' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करून महिमा टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली, मात्र एका अपघातानंतर तिचं करिअर उद्ध्वस्त झालं.
अपघातामुळं करिअर उद्ध्वस्त :महिमा त्या दिवसांत 'दिल क्या करे' या चित्रपटाचं शूट करत होती. एके दिवशी ती स्वत: गाडी चालवत सेटवर जात होती. यादरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकनं तिच्या कारला धडक दिली. या अपघातात महिमा गंभीर जखमी झाली आणि सुमारे 67 काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यात रुतले. या अपघातामुळे तिचा चेहरा खराब झाल्यामुळे तिनं इंडस्ट्रीला अलविदा केला. यावेळी अजय देवगणनं महिमाला साथ दिली. महिमा चौधरी त्या अपघाताच्या धक्क्यातून पूर्णपणं सावरली. त्यानंतर तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं. आपल्या मुलीचं संगोपन करताना महिमा चौधरीनं कर्करोगावर उपचार घेतले. सध्या ती पूर्णपणे बरी आहे आणि कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी समाजात जनजागृती करते.