मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. या दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी दुसऱ्या तिसऱ्या कोणीही दिली नसून त्या जोडप्याच्या स्वयंपाक्याने दिली आहे. या धमकीबद्दल अभिनेत्री माहीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती, मात्र भीतीमुळे तिने या सर्व पोस्ट डिलीट केल्या. आता खुद्द अभिनेत्रीनेच याबाबत खुलासा केला आहे.
गेल्या गुरुवारी माहीने यासंदर्भात अनेक ट्विट केले होते. या सर्व ट्विटमध्ये अभिनेत्रीने माहिती दिली होती की, तिने अलीकडेच स्वयंपाकी ठेवला होता. पण त्याने घरात चोरी करायला सुरुवात केली होती. दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वयंपाक्याला अटक केली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली व त्यानंतर दाम्पत्य घाबरले आहे. कारण कुकने त्याच्यावर खंजीर खुपसण्याची धमकी दिली आहे.