मुंबई- लोकशाहीर शाहीर साबळे यांनी आपल्या कलेद्वारे केलेले समाजकार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 'महाराष्ट्र शाहीर’ च्या ट्रेलर लॉन्चवेळी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी महत्त्वाचे काम आल्यामुळे ते या ट्रेलर लाँच सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत यांच्या हस्ते या सिनेमाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, 'शाहीर साबळे याच्याबद्दल शाळकरी मुलांनादेखील माहिती असली पाहिजे यासाठी हा बायोपिक शाळाशाळांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल.'
'महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर- 'महाराष्ट्र शाहीर’ साहजिकच एक संगीतप्रधान चित्रपट आहे. आपल्या संगीताच्या जादूने संगीतप्रेमींना वेड लावणारी संगीत दिग्दर्शक द्वयी अजय अतुल यांनी या चित्रपटाद्वारे सांगीतिक मेजवानी दिली आहे. या चित्रपटातून शाहिरांच्या विविधांगी गाण्यांची पर्वणी ऐकायला मिळणार आहे. शाहीर साबळे यांची गाणी, अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे यांच्यातील गोड आणि भावनिक प्रसंग, शाहिरांनी राजकीय नेत्यांबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यांचे राजकीय क्षेत्रातील सामाजिक योगदान याची झलक या चित्रपटाच्या ट्रेलर मधून घडते. ‘महाराष्ट्र शाहीर’ ची बिग बजेट निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची असून लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले आजोबा शाहीर साबळे यांच्यावरील या बायोपिकचे दिग्दर्शन केले आहे.