महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Maharashtra Shaheer Biopic : 'महाराष्ट्र शाहीर' म्यूझिकल बायोपिक म्हणजे केदार शिंदेंची आजोबांना श्रद्धांजली - Maharashtra Shaheer biopic

'महाराष्ट्र शाहीर' शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट त्यांचे नातू केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. लहानपणापासून आजोबांची साथ त्यांनी लाभली. कलेच्या क्षेत्रात मुशाफिरी करण्याचा मंत्र आजोबांनीच त्यांना दिला. त्यामुळे महाराष्ट्र शाहीर बायोपिक हा नातवाने आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.

Etv Bharat
'महाराष्ट्र शाहीर' म्यूझिकल बायोपिक

By

Published : Apr 24, 2023, 3:31 PM IST

मुंबई - आपला भारत विविधांगी संस्कृती आणि कलांनी भरलेला देश आहे. देशातील प्रत्येक राज्याची विशेष परंपरा आहे आणि तेथील लोककला वेगळी जरी असली तरी समाजप्रबोधन करणारी आहे. खासकरून स्वातंत्र्यपूर्व काळात याच लोककलांनी आणि लोक कलाकारांनी सामान्य माणसांमध्ये जनजागृती निर्माण केली आणि इंग्रजांविरोधात उभे राहण्याची प्रेरणा आणि ताकत दिली. महाराष्ट्रातही अनेक लोक कलावंत ही जबाबदारी सांभाळत होते आणि त्यातीलच एक म्हणजे शाहीर साबळे. शाहीर साबळे हे एक लोककलाकार होते परंतु त्यांचे समाज घडणीचे कार्य उत्तुंग आहे. त्यांनी आपल्या गाण्यांमधून लोकांचे मनोरंजन केलेच परंतु समाज प्रबोधनही केले. हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष असून त्यांचा नातू लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट बनविला आहे.

'महाराष्ट्र शाहीर' बायोपिक

शाहीर सांबळेंची महाराष्ट्राची लोकधारा- महाराष्ट्र शाहीर हा महाराष्ट्रातील लोक कलाकार, गायक, नाटककार आणि लोकनाट्य निर्माता आणि दिग्दर्शक पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून अभिनेता अंकुश चौधरी यात प्रमुख भूमिका साकारतोय. याचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले की, 'शाहीर साबळे यांना मी लहानपणापासून बघत आलो आणि त्यांचे माझ्यावर संस्कार होत गेले. आम्ही सर्व त्यांना बाबा म्हणायचो. त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात आम्ही लहानपणापासून काम करतोय. मी, भारत जाधव, अंकुश चौधरी, संतोष पवार, अरुण कदम हे त्या लोकधारेमुळे कलाकार बनले. बाबा कळायला लागले, मी दहा एक वर्षांचा होतो तेव्हापासून. त्यांचे कार्य खूप मोठे आहे आणि सामाजिक योगदान सुद्धा अमाप आहे. सूर्य उगवला प्रकाश पडला, दादला नको गं बाई, देव माझा मल्हारी, आम्ही गोंधळी, जेजुरीच्या खंडेराया, ई. अनेक अजरामर गाणी बाबांनी दिली आहेत. जय जय महाराष्ट्र माझा तर आता राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे.

साबळेंची शिवसेनेला साथ - जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा बाळासाहेबांनी (ठाकरे) सांगितले होते की आम्ही २०% राजकारण आणि ८० % समाजकारण करण्यासाठी तिची स्थापना केली आहे. तेव्हा बाबांनी बाळासाहेबांना साथ दिली हे म्हणत की, 'मी ८० % समाजकारणासाठी तुमच्यासोबत आहे.' अशा कलावंताची आठवण पुसट होत चालली होती. त्याची मला वारंवार खंत वाटत होती. सरकार दरबारी शाहीर साबळे यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे व्हावे असे आवर्जून वाटत होते. बाबा आणि त्यांचे कार्य पुढच्या पिढीलाही कळावे म्हणून मी हा चित्रपट बनविण्याचा घाट घातला. हा चित्रपट बनविताना एव्हरेस्ट एंटरटेंमेंटचे संजय छाब्रिया माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. हा मराठीमधील सर्वात महागडा चित्रपट आहे. आणि आम्ही जास्तीत जास्त व प्रामाणिक प्रयास केले आहेत आणि चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षक खूप भरभरुर आनंद घेऊन जातील याची मी ग्वाही देतो.'

'महाराष्ट्र शाहीर' बायोपिक
हे शाहीर साबळे यांचे जन्म शताब्दी वर्ष असून केदार शिंदे दिग्दर्शित आणि संजय छाब्रिया आणि बेला शिंदे निर्मित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details