मुंबई- दिवंगत अभिनेत्री मधुबालाच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार होत असून यात तिचे कुटुंबीय मदत करीत आहेत. अभिनेत्री मधुबालाची सर्वात धाकटी बहीण मधुर ब्रिज भूषण म्हणते की ती "काही अनावश्यक उपद्रव निर्माण झाल्याबद्दल दुःखी आहे." मधुरची कंपनी, मधुबाला व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड देखील एका टॉप स्टुडिओसह बायोपिकची सह-निर्मिती करण्याच्या तयारीत आहे.
अभिनेत्रीची बहीण मधुर ब्रिज भूषण म्हणते: "कोणत्याही परवानगीशिवाय माझ्या बहिणीच्या जीवनावरील चित्रपट/मालिका इत्यादींच्या बाबतीत काही व्यक्ती काही गैरप्रकार करत आहेत हे मला कळले आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी अशा कोणत्याही साहसात भाग घेऊ नये. अन्यथा, मी शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही."
त्याच वेळी मधुर ब्रिज भूषण ने हे देखील उघड केले आहे की तिने, तिच्या टीमचे सदस्य तसेच तिच्या वकिलांनी "मधुबालाच्या जीवनकथेच्या हक्कांचे बेकायदेशीर शोषण करणाऱ्या काही व्यक्ती, कंपन्यांविरुद्ध काही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे."
मधुर ब्रिज भूषणने अभिनेते, निर्माते आणि प्रतिभावंतांना परवानगी नसलेल्या मधुबालाशी संबंधित प्रकल्पांचा भाग होऊ नये अशी विनंती केली आहे. ती म्हणते: "मी विनंती करते की कोणत्याही कलाकाराने, स्टुडिओने, निर्मात्याने किंवा कोणत्याही इतर व्यक्तीने माझ्याद्वारे स्पष्टपणे अधिकृत नसलेल्या कोणत्याही प्रकल्पात भागीदारी करू नये कारण ते माझ्या कुटुंबाच्या कायदेशीर आणि भावनिक अधिकारांचे उल्लंघन होईल."